गुढी पाडव्यानिमित्त कोट्यवधीची उलाढाल
By Admin | Updated: March 29, 2017 02:28 IST2017-03-29T02:28:22+5:302017-03-29T02:28:22+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा हा सण मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला

गुढी पाडव्यानिमित्त कोट्यवधीची उलाढाल
पिंपरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा हा सण मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या.
घरापुढे गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यासह एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. पाडव्याच्या मुहुर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह वाहन खरेदीसाठीही नागरिकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. दुचाकींसह चारचाकी मोटारींचीही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. सोने खरेदीसाठी सराफी पेढ्यांमध्ये देखील गर्दी झाली होती. गुढी उभारण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदीसाठी चिंचवडगाव, पिंपरी कॅम्प आदी भागात सकाळपासूनच गर्दी होती. अनेकांनी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन घराची नोंदणी केली.
शहरातील मंदिरांमध्येही सकाळपासूनच काकड आरती, महापूजा, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासह दर्शनासाठी देखील भाविकांनी गर्दी केली होती. यमुनानगर येथे भारतीय संस्कृती मंचाच्या यमुनानगर शाखेच्या वतीने शोभायात्रा काढली होती. शोभायात्रेत मॉडर्न हायस्कूल व शिवभूमी विद्यालयाचे ढोल, झांज, लेझीम पथक सहभागी झाले होते. केरळी वाद्यवृदांचाही समावेश होता. शोभायात्रा माता अमृतानंदमयी मठात पोहोचल्यानंतर गुढीचे पूजन करण्यात आले. या वेळी विश्वनाथ जोशी, रमाकांत श्रीखंडे, शरद इनामदार, सुभाष सराफ आदी उपस्थित होते.
यासह शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत नागरिक पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. विविध खासगी वाहतूक संघटनांच्या वतीनेही महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
दोन दिवस अगोदरपासूनच एकमेकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यासह सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला.
नोटबंदीनंतर बाजार सावरला असून, त्याचे प्रतिबिंब सोने खरेदीच्या निमित्ताने मंगळवारी (दि. २८) सराफा बाजारात पाहायला मिळाले. मुहूर्त खरेदी, लग्न समारंभापासून ते गुंतवणुकीसाठी नागरिकांनी सोने खरेदीसाठी गुढी पाडव्याचा दिवस साजरा केला. गेल्या वर्षीपेक्षा सुमारे पंचवीस ते ४० टक्के अधिक खरेदी झाल्याने सराफी व्यवसायिकांनी सांगितले. मात्र, ९८ टक्के नागरिकांनी तब्बल खरेदी रोखीने खरेदी करून कॅशलेस व्यवहाराला बगल दिली असल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)
आरटीओमध्ये ९ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल जमा
पुणे : नोटबंदीनंतर वाहन उद्योगाला गुढी पाडव्याच्या मुहूर्ताने बळ दिले आहे. गेल्या चार दिवसात तब्बल ४ हजार ३९१ वाहनांची विक्री झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) झाली आहे. यातून आरटीओला तब्बल ९ कोटी ४५ लाख ६४ हजार ८१५ रूपयांचा महसूल मिळाला.
गुढी पाडव्याच्या दिवशी नवीन वाहन घरी नेण्यासाठी काही दिवस आधी नोंदणी केली जाते. नागरिकांनी २५ ते २८ मार्च या कालावधीत ३ हजार २३३ दुचाकी तर, १ हजार ३६ मोटार कारची खरेदी केली. तसेच दोन रुग्णवाहिका, पाच बस, २५ मालवाहतूक ट्रक, ६९ मोटार कॅब, ८ तीनचाकी मालवाहू गाड्या आणि १३ रिक्षांचा समावेश आहे.
त्यातील ६०५ वाहनचालंकानी प्रत्यक्ष पाडव्याच्या दिवशी वाहन खरेदी केली. त्यात ५७० दुचाकी, १ मोपेड, ३१ मोटार कार, २ मालवाहू ट्रक आणि एका रिक्षाचा समावेश आहे. या वाहनांच्या करापोटी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला ९ कोटी ४५ लाख ६४ हजार ८१५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यातील १ कोटी ४१ लाख ५६ हजार रुपयांचा महसूल मंगळवारी जमा झाला.
कॅबची नोंदणी वाढली
गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर १३ रिक्षा आणि ६९ कॅबची नोंदणी झाली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांपुढील व्यवसायिक स्पर्धा वाढली असल्याचे मानले जाते.
वाहन विक्री संख्या
वाहन प्रकारसंख्या
मोटरसायकल/स्कुटर३२३३
मोटार कार१०३६
रूग्णवाहिका२
बस५
मालवाहू गाड्या२५
कॅब६९
मालवाहू तीनचाकी८
प्रवासी रिक्षा १३