याप्रकरणी मयूर सतीश उघाडे (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेेल्या माहितीनुसार सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, प्रकाश वाघमारे, सुनील जावळे, महेश गायकवाड, नीलेश कदम, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, अक्षय नवले, प्रसन्न घाडगे यांनी केली आहे.
सोमवार (दि. १) २०२१ रोजी सदर पथक कामशेत परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय खबऱ्यामार्फत मयूर उघाडे हा पुणे - अहमदाबाद भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स लक्झरी क्रमांक जीजे ०३ बीटी २२५७ यामधून त्याचेकडील बॅगामध्ये अवैध विदेशी दारुसाठा विक्रीसाठी गुजरात येथे घेऊन जाणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने कामशेत (ता. मावळ) येथील एक्सप्रेस महामार्गावर बोगद्याचे नजीक सदर नंबरची ट्रॅव्हल्स लक्झरी बस अडवून तपासणी केली असता मयूर उघाडे याचेकडे २४ हजार ५०८ रूपये किमतीचा अवैध विदेशी दारूचा साठा मिळून आला. तो जप्त केला आहे. चौकशीत सदर दारू ही मिलिटरी कॅन्टीनमधून घेतली असल्याचे आढळून आलेले आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी कामशेत पोलीस ठाण्याचे ताब्यात दिला असून, पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी हे करीत आहेत.