एमआयडीसीकडूनही होणार पाणीकपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2016 05:48 IST2016-05-06T05:48:23+5:302016-05-06T05:48:23+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) पाणीकपात केली आहे.

एमआयडीसीकडूनही होणार पाणीकपात
चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) पाणीकपात केली आहे. या निर्णयानुसार औद्योगिक क्षेत्रात गुरुवारी व रविवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
एमआयडीसी अंतर्गत पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, दिघी, तळवडे, चाकण या भागात पाणीपुरवठा केला जातो. दुष्काळी परिस्थिती पाहून जलसंपदा विभागाने पाणीकपातीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक गुरुवारसाठी बुधवारी रात्री बारापासून गुरुवारी रात्री बारापर्यंत आणि रविवारसाठी म्हणजे शनिवारी रात्री बारापासून रविवारी रात्री बारापर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. असा आठवड्यातील एकूण दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी सर्वांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३ तारखेपासून शहरात पाणीकपात केली असून, दिवसाआड पाण्याचे नियोजन केले आहे. त्यातच एमआयडीसीनेही औद्योगिक परिसरात पाणीकपात करण्याचे जाहीर केले आहे.