आरडाओरड्यामुळे एमआयडीसी परिसर हादरला

By Admin | Updated: January 26, 2015 01:34 IST2015-01-26T01:34:48+5:302015-01-26T01:34:48+5:30

काही कळण्याचा आत शेडचे लोखंडी छत आणि पाठोपाठ शेजारची भिंत कोसळली.

MIDC camp collapses due to loud noise | आरडाओरड्यामुळे एमआयडीसी परिसर हादरला

आरडाओरड्यामुळे एमआयडीसी परिसर हादरला

पिंपरी : बंद कंपनीत नेहमीप्रमाणे काम सुरू होते. अचानक काही कळण्याचा आत शेडचे लोखंडी छत आणि पाठोपाठ शेजारची भिंत कोसळली. छत व भिंत कोसळण्याच्या आवाज आणि कामगारांच्या आरडाओरड्यामुळे एमआयडीसी, भोसरी या औद्योगिक क्षेत्रातील शांतता भंगली.
एमआयडीसी, भोसरीतील जे ब्लॉकमधील क्रमांक ३२६ या ठिकाणी ही स्मॅश एन्टरप्राईजेस ही कंपनी आहे. क्वॉलिटी सर्कल फोरमच्या कार्यालयापासून ५० मीटर अंतरावर आणि बालाजीनगर झोपडपट्टीला लागून रस्त्याच्या चौकाशेजारी कंपनी आहे. सध्या कंपनी बंद आहे. शेजारी दाल मिल आहे. कंपनीला लागूनच टपरीवजा कॅन्टीन आहे. आजूबाजूला मालवाहू ट्रॅक आणि टेम्पो थांबले होते. रविवार असूनही एमआयडीसीतील शेकडो कंपन्यांमध्ये काम सुरू होते. यंत्रांच्या धडधडीचा आवाज होता.
स्मॅश एन्टरप्राईजेस कंपनीतील जुन्या शेड बदलण्याचे काम एका खासगी ठेकेदारामार्फत सुरू होते. ७ ते ८ मजूर काही दिवसांपासून हे काम करीत होते. शेडमधील आतील बाजूस असलेली आधाराची भिंत काढण्यात आली होती. नेहमीप्रमाणे सकाळी नऊला येऊन हे कामगार, मजूर काम करीत होते. अचानक सव्वाबाराच्या सुमारास सिमेंटचे पत्रे, लोखंडी छत सांगाड्यासह खाली आले. त्याच्या वजनाने भिंतीचा काही भागही कोसळला. जुन्या भिंतीच्या ढिगामुळे परिसरात धुरळा पसरला. मोठा आवाज आणि बचावलेल्या कामगारांच्या आरडाओरडा परिसरात घुमला. अचानक झालेल्या या गोंधळ आणि पडझडीमुळे लगतच्या कंपन्यांतील कामगार, कॅन्टीनमध्ये बसलेले मजूर व नागरिक घटनास्थळी धावून गेले.
जखमी कामगारांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. बचावलेले आणि भेदरलेले कामगार त्वरित बाहेर येऊन रस्त्यावर थांबले. थोड्याच वेळात अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. भोसरी व संत तुकारामनगर बंबाच्या गाड्या आल्या. अग्निशामक उपअधिकारी ज्ञानोबा भालेकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी जखमींना सुरक्षितपणे बाजूला काढले. एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.
थोड्याच वेळात एमआयडीसी व भोसरी ठाण्याच्या पथकासह पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, गस्तीपथक, लांडेवाडी चौकीचे कर्मचारी, उपनिरीक्षक एन. पी. बोचरे, उपनिरीक्षक भुजबळ, हवालदार रामदास जाधव, पी. एम. भवारी, महोदव कवडे, मार्शल रोहिदास सांगडे आदी दाखल झाले. बालाजीनगरातील रहिवासी आणि बघ्यांनी गर्दी केली. त्यामुळे परिसरात गर्दी वाढली. येणारे-जाणारे वाहनचालकही थांबून पाहू लागले. पोलिसांनी घटनास्थळाला वेढा घातला. बघ्यांना परिसरातून हुसकावून लावण्यात आले. तरीही नागरिक दूर जाऊन थांबत होते. पोलिसांच्या जीपमधूनच जखमींना त्वरित संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतरही बघ्यांची गर्दी परिसरातून हटत नव्हती. हे वृत्त समजताच नागरिक आणि एमआयडीसी भागातील कामगार येथे येत होते. घटना कशी घडली, याची विचारणा करीत होते. पोलीस कर्मचारी सायंकाळपर्यंत तेथे बसून होते. गर्दी वाढताच बघ्यांना हुसकावून लावत होते.(प्रतिनिधी)

Web Title: MIDC camp collapses due to loud noise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.