दुभाजकामधून धावणार मेट्रो
By Admin | Updated: April 16, 2017 04:02 IST2017-04-16T04:02:30+5:302017-04-16T04:02:30+5:30
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वारगेट ते पिंपरी हा मेट्रोमार्ग करण्यात येणार आहे. हा मेट्रोमार्ग करताना दापोडी ते पिंपरीदरम्यान पुणे - मुंबई महामार्गावरील रस्ता

दुभाजकामधून धावणार मेट्रो
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वारगेट ते पिंपरी हा मेट्रोमार्ग करण्यात येणार आहे. हा मेट्रोमार्ग करताना दापोडी ते पिंपरीदरम्यान पुणे - मुंबई महामार्गावरील रस्ता दुभाजकामधून मेट्रो धावणार आहे. महापालिकेने केलेल्या फेरआखणीत हा मार्ग सुचविण्यात आला असून, महामेट्रो कॉर्पोरेशननेही या मार्गाला मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन या स्वायत्त कंपनीमार्फ त स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्ग करण्यात येणार आहे. या नियोजनानुसार, मेट्रो मार्ग हा पिंपरी ते दापोडी हॅरिस पूल असा पदपथाच्या कडेने नियोजित केला होता. या कामाची निविदा कार्यवाही पूर्ण करण्यापूर्वी मार्गाची अंतिम आखणी पदपथालगत करण्याची मागणी पुणे मेट्रोने महापालिकेकडे २७ जानेवारीला केली होती. तसेच त्याचे सादरीकरणही केले होते. बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता यांनी पिंपरी ते दापोडी रस्ता विकसित करताना केलेल्या कामाच्या तांत्रिक बाबींचा विचार करून पुणे मेट्रोने मागणी केलेल्या आखणीस असहमती दर्शविली. तसेच तांत्रिक कारणे नमूद करून पुणे मेट्रोचा मार्ग निगडी- दापोडी रस्त्याच्या मध्यभागातून आखणी करण्याबाबत सुचविले होते.
त्यानुसार, बीआरटीएसचे सह शहर अभियंता यांनी महामेट्रोचे कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या पाहणीत पदपथाच्याकडेने मेट्रोचे काम केल्यास काही त्रुटी आढळून आल्या. त्यामध्ये अस्तित्वातील पदपथांखालील सर्व सेवावाहिन्या स्थलांतरित कराव्या लागणार. सेवा रस्त्यांची रुंदी ९ मीटरवरून ४.७५ मीटर इतकी कमी होणार आहे. वारंवार वाहतूककोंडीची दाट शक्यता आहे. प्रत्येक मेट्रो स्टेशनसाठी ५ ते ७ मीटर रुंद व १४० मीटर लांब क्षेत्राच्या भूसंपादनाची आवश्यकता लागणार. कालावधीचा विचार करता प्रकल्पाला उशीर होणार. याशिवाय सुमारे ६५० झाडे काढावी लागणार आहेत. या त्रुटींचा विचार करून एक्सप्रेस लेन व बीआरटीएस लेनच्या मधील २ मीटर रुंद दुभाजकामधून मेट्रो मागार्ची आखणी करून बीआरटीएसचे सह शहर अभियंता यांनी १५ व १७ मार्च रोजी महापालिका आयुक्त व पदाधिकाऱ्यांना या मार्गाचे सादरीकरण केले होते. (प्रतिनिधी)
वाहतूक नियोजन सोपे
निगडी- दापोडी रस्त्यावर बीआरटी, मेट्रो, लोकल या वाहतुकीच्या तीनही पर्यायांमुळे एकात्मिक वाहतूक नियोजन करणे सोपे होणार आहे. याशिवाय पदपथामधील सेवावाहिन्या स्थलांतरित करण्याची गरज राहणार नाही. बीआरटीएस लेन, सेवा रस्ते अखंडित राहतील. वाहतूककोंडी कमी होईल. झाडेही कमीत कमी काढावी लागणार आणि भूसंपादनाची गरज नसल्याने प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण होणार.
अशी असतील मेट्रो स्टेशन
पिंपरी, संत तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी (फोर्ब्ज मार्शल) फुगेवाडी (जकात नाका), दापोडी (अरुण टॉकीज).