लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे शहरात उत्साहात स्वागत होत असताना विविध संस्था-संघटनांच्या वतीने एकतेचा संदेश देण्यात आला. पवित्र रमजान महिन्याचा उपवास मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांसोबत एकत्रित येत सोडला. सोहळ्यात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन झाले. नाना पेठेतील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या प्रसादाने रोजा ईफ्तार साजरा झाला. तर दि मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट आणि श्री समर्थ स्टॉलधारक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र रमजान महिन्याचा उपवास वारकरी बांधवांनी एकत्रित बसून सोडला. साखळीपीर मंदिरातर्फे आयोजित कार्यक्रमाला मुस्लिम समुदायाचे अभ्यासक, मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, बौद्ध धर्माचे प्रचारक जयसिंगराव कांबळे, शिख धर्माचे मोकासिंग अरोरो, मुस्लिम धर्माचे इकबाल शेख, अन्वर राजन उपस्थित होते. दि मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमाला ट्रस्टचे कार्याध्यक्ष मुश्ताक पटेल, डॉ. मिलिंद भोई, रशीद खान, कांता येळवंडे, श्रीरंग हुलावळे, अशोक इगावे, नारायण धनावडे आदी सहभागी झाले होते.
वारकरी व मुस्लिम बांधवांचा एकतेचा संदेश
By admin | Updated: June 19, 2017 05:18 IST