‘आर्यभूषण’च्या जागेवर व्यापारी संकुल

By Admin | Updated: June 5, 2015 23:46 IST2015-06-05T23:46:31+5:302015-06-05T23:46:31+5:30

इन्स्टिट्यूट व गोखले हॉल या सर्व्हंटस आॅफ इंडिया सोसायटीच्या संस्थांच्या जागी व्यावसायिक संकुले बांधण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे.

Merchant package in place of 'Aryabhushan' | ‘आर्यभूषण’च्या जागेवर व्यापारी संकुल

‘आर्यभूषण’च्या जागेवर व्यापारी संकुल

पुणे : शहराच्या मध्यवर्ती असलेली आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या आर्यभूषण प्रेस, रानडे इन्स्टिट्यूट व गोखले हॉल या सर्व्हंटस आॅफ इंडिया सोसायटीच्या संस्थांच्या जागी व्यावसायिक संकुले बांधण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. सोसायटीच्या देशातील विविध राज्यातील जागांवर कब्जा करून त्यामधून करोडो रूपये मिळवण्याचा डाव असल्याचा गौप्यस्फोट गोखले यांचे पणतू अ‍ॅड. डॉ. सुनील गोखले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला.
काही एकरमध्ये असलेल्या हया जमिनी देश सेवक घडविण्यासाठी देण्यात आल्या होत्या. त्या जमिनींवर काही लोकांनी मालकी प्रस्थापित केल्याची टीका डॉ.गोखले यांनी केली. आर्यभूषण प्रेस ही महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाला भाड्याने दिलेली जागा आहे. परंतु येथील संचालक मंडळ त्याची विल्हेवाट लावत आहेत. आर्यभूषण प्रेस ही ऐतिहासिक वास्तू असूनही तिची मोडतोड करून तेथे व्यावसायिक संकुल थाटण्याचा डाव होता. मात्र त्याला विरोध केल्यावर हे काम थांबले आहे. तसेच मुद्रणालयाचे संचालक अकुंश काकडे व सचिव मिलिंद देशमुख यांच्यात हात मिळवणी झाल्यामुळे संचालक मंडळाला संस्थेची तोडफोड करण्याची मुभाच मिळाल्याची टीकाही गोखलेंनी यावेळी केली.
रानडे इन्स्टिट्यूटची जागा संस्थेची आहे. पण ती जागा घशात घालण्यासाठी तेथील पत्रकारिता व परकीय भाषा विभाग हलविण्याचे प्रयत्न सुरू असून आर्य भूषण प्रेस व रानडे इन्स्टिट्यूट अशी सुमारे दोन एकर जागा व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्याचा डाव असल्याचे गोखले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याशिवाय गोखले अर्थशास्त्र संस्थेतील गोखले यांच्या बंगल्याचा चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापर केला जातो. आणि त्याचा केवळ मुख्य सभागृह नीटनेटका ठेवण्यात आला आहे व इतर खोल्या सिक्युरिटीवाल्याला राहण्यासाठी दिल्या आहेत. अशाच प्रकारे लक्ष्मी रस्त्यावरील गोखले हॉल पाडून येथेही व्यावसायिक संकुल उभा करायचा विचार असताना अचानक ही वास्तू हेरिटेज असल्याची जाणीव झाली व त्याला स्थगिती मिळाली. परंतु या वास्तूच्या मागील परिसरात व्यावसायिक संकुल उभारण्यासाठी बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सोसायटीमध्ये असलेल्या नऊ लोकपैकी बहुतेकांनी सत्तरी पार केलेली आहे. त्यामुळे ते बैठकीला हजर राहू शकत नाहीत. हयाच गोष्टीचा फायदा घेऊन सोसायटीचा ताबा देशमुख व ज्येष्ठ सभासद रमाकांत लेंका यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांनी सर्व जागांवर ठेकेदारी दाखवत सोसायटीच्या सर्व जागा विक्रीला काढायला निघाले असल्याचा आरोप डॉ. गोखले यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

बिनबुडाचे आरोप
संस्थेचे सर्व काम न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे योग्य पद्धतीने सुरू आहे. मी आणि लेंका यांनी कोणतीही जागा विकायला काढलेली नाही. गोखले यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावे. कारण ही व्यक्तिगत जागा नसून ती विकता येत नाही. हे सर्व आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत.
- मिलिंद देशमुख, सचिव, सर्व्हंटस आॅफ इंडिया सोसायटी

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे
डॉ. सुनील गोखले यांनी या बेफिकीर कारासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. ना.गोखले हे कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. त्यामुळे सोनिया गांधी व राहुल गांधी या कॉंग्रेच्या प्रमुख नेत्यांनी या प्रकरणामध्ये मध्ये लक्ष घालावे असे आवाहन करणारे पत्र गोखले त्यांना पाठवणार आहेत.

Web Title: Merchant package in place of 'Aryabhushan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.