महिला प्रतिनिधी पडणार पुरुषांना भारी
By Admin | Updated: December 16, 2014 04:18 IST2014-12-16T04:18:36+5:302014-12-16T04:18:36+5:30
महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डासह खुल्या वॉर्डातही महिला उमेदवार असल्याने त्याची संख्या वाढली आहे. खडकीसह पुणे आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातही हे चित्र आहे.

महिला प्रतिनिधी पडणार पुरुषांना भारी
मिलिंद कांबळे, पिंपरी
महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डासह खुल्या वॉर्डातही महिला उमेदवार असल्याने त्याची संख्या वाढली आहे. खडकीसह पुणे आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातही हे चित्र आहे. यामुळे महिलांना लोकप्रतिनिधी पदासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली आहे. हा बदल महिला सक्षमीकरणास प्रोत्साहन देणारा ठरत आहे.
देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डात महिलांना ३३ टक्के आरक्षण मे २००८ च्या निवडणूकीपासून लागू झाले आहे. यानुसार खडकी व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात आठपैकी तीन आणि देहूरोड कॅन्टोन्मेंटमध्ये सातपैकी दोन वॉर्ड महिलासाठी राखीव झाले आहेत. उर्वरित वॉर्ड खुला आणि मागासवर्गीय गटासाठी आहेत.
गेल्या वेळेस पुरुष मंडळींनी पतीला संधी देत निवडणूकीत उतरविले. नगरसेवक म्हणून महिलांनी चांगली कामगिरी केली. त्यांनी वॉर्डात सक्रियता दाखविली. वर्ष-दोन वर्षांत त्या चांगल्याच रुळल्या. लाजरेपणा सोडत लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय झाल्या. बोर्ड कामकाज आणि सामाजिक क्षेत्रात त्या पतीच्या गैरहजेरीतही उत्तम प्रकारे कारभार सांभाळू लागल्या.
या त्याच्या कार्यपद्धतीमुळे नवरे मंडळीपेक्षा या महिलाच अधिक लोकप्रिय झाल्या. नागरिकांकडून त्यांना अधिक पसंती दिली जात आहे. निवडणूकीपूर्वी या बाबतची चाचपणी घेतली गेली. त्यात ही बाब उघड झाल्याने नवरे मंडळीनी आपल्या उत्साहाला आवर घालत, नाईलाजस्तव पुन्हा पत्नीला संधी दिली आहे. यामुळे खुला वॉर्डातही महिला उमेदवार रिंगणात आहेत. इच्छुक पुरुष मंडळींनी राखीव वॉर्डात आपल्या घरातील महिलांना पुढे केले आहे. पती, सून, मुलगी,आई, वहिणी आदीना संधी दिली आहे. या कारणामुळे महिला राखीव वॉर्ड आणि खुल्या वॉर्डातील उमेदवारांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मतदारांनी पुरुषांपेक्षा महिलांना पसंती दिल्यास कॅन्टोन्मेंट बोर्डात महिला लोकप्रतिनिधीची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असणार आहे. यामुळे बोर्डाची सुत्रे महिला वर्गाकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खडकी बोर्डातील महिला राखीव असलेल्या तीन वॉर्डात एकूण २८ महिला तर, खुल्या वॉर्डात ५ महिला आहेत. देहुरोडमध्ये महिलांच्या दोन राखीव वॉर्डात ८ जणी तर, खुल्या वॉर्डात ४ जणी रिंगणात आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातही महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे.