श्रीराम पतसंस्थेच्या सभासदांना मिळणार १२ टक्के लाभांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST2021-09-02T04:22:56+5:302021-09-02T04:22:56+5:30
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था यावर्षी सभासदांची दिवाळी गोड करणार असून, सभासदांना १२ टक्के ...

श्रीराम पतसंस्थेच्या सभासदांना मिळणार १२ टक्के लाभांश
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था यावर्षी सभासदांची दिवाळी गोड करणार असून, सभासदांना १२ टक्के लाभांशासह दिवाळी भेट देणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे यांनी दिली.
पतसंस्थेचे संस्थापक माजी आमदार वल्लभ बेनके व आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. या सभेत सर्व विषयांना मंजुरी देत सभासदांनी खेळीमेळीच्या वातावरणात ऑनलाइन सभेत भाग घेतला.
या सभेस संस्थेचे ज्येष्ठ सभासद देशमुख, शिवाजीराव गायकवाड, बाबुराव मुळे, रमेश पाटे, राजश्री बेनके, शशिकांत वाजगे, अनिल थोरात, येल्लू लोखंडे, विजय घोगरे, अनिल डेरे, ज्ञानेश्वर रासने नवनाथ चौगुले आमिर तांबोळी, शीलाताई मांडे, सीताराम पाटे उपस्थित होते.
अध्यक्ष तानाजी डेरे यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. कोरोना काळातही संस्थेची विकासाकडे वाटचाल असून आर्थिक गुणात्मक आलेख उंचावत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. संस्थेच्या १३० कोटी रुपयांच्या ठेवी असून सभासद संख्या ७४२८ आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल ४ कोटी ८४ लाख तर कर्ज वाटप ८७ कोटी २२ लाख रुपये आहे. खेळते भांडवल १५० कोटी ४४ लाख असून अहवाल वर्षात सर्व शासकीय तरतुदी करून एक कोटी १४ लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. वैधानिक लेखापरीक्षण वर्ग ‘अ’ प्राप्त आहे.
संस्थेचे सभासद शिवाजीराव गायकवाड यांनी केलेल्या सूचनेला पाठिंबा दर्शवत संचालक मंडळांनी या वर्षी १२ टक्के लाभांश व दिवाळी भेट देण्याचे मान्य केले असून, त्यास सभासदांनी पाठिंबा दर्शवला आहे. कोरोना काळात सभासदांचा दोन लाख रुपयांचा विमा उतरविला आहे. त्याचा लाभ काही सभासदांना झाला आहे. श्रीराम पतसंस्था, श्रीराम मित्र मंडळ व सीतामाई महिला मंडळ यांच्या सहकार्याने दोन महिने हातावर पोट भरणाऱ्या कामगार वर्गाला व मोलमजुरीसाठी आलेल्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण घरपोच देण्याचे काम केले आहे. संस्थेने २०२०-२१ या सालातील महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार पटकावला आहे. या वेळी संस्थेचे संचालक अमित बेनके यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. संस्थेचे उपाध्यक्ष सुनील श्रीवत यांनी आभार मानले.
फोटो
नारायणगाव येथील श्रीराम पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना.