सदस्यनिवडीत राष्ट्रवादीचे वर्चस्व
By Admin | Updated: August 22, 2015 02:11 IST2015-08-22T02:11:16+5:302015-08-22T02:11:16+5:30
महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांमध्ये (क्षेत्रीय कार्यालयांमध्ये) बिनसरकारी व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली

सदस्यनिवडीत राष्ट्रवादीचे वर्चस्व
पिंपरी : महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांमध्ये (क्षेत्रीय कार्यालयांमध्ये) बिनसरकारी व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली. १८ जागांसाठी ११३ इच्छुकांचे अर्ज दाखल झाले होते. स्वीकृत सदस्य निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे.
‘अ ’प्रभाग समिती सभेत प्रभागाध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ ला निवडणूक झाली. त्या वेळी सतीश झांबरे, गिरीश कुटे, बेबी नंदा भोंडवे यांची ‘अ’ प्रभागाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. तर ब प्रभाग समिती सभेत प्रभागाध्यक्ष संदीप चिंचवडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. गोरक्ष पाषाणकर, गिरीश शेंडगे, शरद लुणावत यांची ‘ब’ प्रभागाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली.
‘क’ प्रभाग समिती सभेत प्रभागाध्यक्ष किरण मोटे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. त्या वेळी सतीश काटे, हमीद शेख, गणेश ढोरे यांची ‘क’ प्रभागाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. तसेच ‘ड’ प्रभाग समिती सभेत प्रभागाध्यक्ष अरुण टाक यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. सागर कोकणे, धनंजय मोहिते, शिवाजी पाटोळे यांची ड प्रभागाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली.
‘ई’ प्रभाग समिती सभेत प्रभागाध्यक्षा विनया तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. त्या वेळी विजय रसाळ, प्रकाश सोमवंशी, संजय आहेर यांची ई प्रभागाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली. तर ‘फ’ प्रभाग समिती सभेत पीठासन अधिकारी नारायण बहिरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. पंकज भालेकर, जितेंद्र पवार, प्रवीण भालेकर यांची फ प्रभागाच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली.
प्रभाग समिती स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीवेळी त्या प्रभागातील प्रभाग अध्यक्ष तसेच सदस्य आणि पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्यांना स्वीकृत सदस्यपदी संधी दिली ते पदाधिकाऱ्यांचे निकटवर्तीय आहेत. कधीतरी पदे देताना पक्ष आपला विचार करेल, संधी देईल अशी अपेक्षा बाळगलेल्या अनेकजण नाराज झाले. त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या. ११३ पैकी १८ जणांना संधी दिली तर ९५ इच्छुकांची नाराजी ओढवली आहे. हे पद राजकीय, पक्षाशी संबंधित नव्हे तर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी होते. तरीही विविध संघटनांच्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले गेले, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)