‘पीएमपी’मध्ये मेगा भरती
By Admin | Updated: July 3, 2016 04:20 IST2016-07-03T04:20:19+5:302016-07-03T04:20:19+5:30
पीएमपीमध्ये रिक्त असलेल्या जागा व बस खरेदीमुळे निर्माण होणार नवीन पदे अशा एकूण ५५० पदांची मेगा भरती केली जाणार आहे.

‘पीएमपी’मध्ये मेगा भरती
पुणे : पीएमपीमध्ये रिक्त असलेल्या जागा व बस खरेदीमुळे निर्माण होणार नवीन पदे अशा एकूण ५५० पदांची मेगा भरती केली जाणार आहे.
यामध्ये ३ हजार चालक, १५०० वाहक व १ हजार हेल्पर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी कामगार म्हणून
भरती केली जाणार असून
त्याची प्रक्रिया येत्या महिनाभरात
सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली.
कर्मचाऱ्यांच्या भरतीबरोबरच त्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आले. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी सर्व डेपोमध्ये व्यायामशाळेचे साहित्य उपलब्ध करून देणे, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्यासाठी मदत म्हणून प्रत्येकी ३ हजार रुपयांची रक्कम देणे, मृत्यूफंडाची रक्कम १ लाख रुपयांपर्यंत वाढविणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळांच्या बैठकीमध्ये घेण्यात आले. या वेळी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शंकुतला धराडे, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष अभिषेक कृष्णा, आयुक्त कुणाल कुमार, पीएमपीचे संचालक आनंद अलकुंटे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके आदी उपस्थित होते.
पीएमपीमध्ये अनेक दिवसांपासून भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही, त्यामुळे चालक, वाहक व हेल्परपदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. गेल्या ४ ते ५ वर्षांत अनेक कर्मचारी निवृत्त झाले तरी त्यांची भरतीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे. सध्या ठेकेदारांकडील तसेच कंत्राटी पद्धतीने चालक, वाहक घेण्यात आले आहेत. नव्याने १५५० बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, त्यामध्ये १ हजार बसची खरेदी केली जाणार आहे, तर ५५० बस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. त्यासाठीही चालक, वाहकांची आवश्यकता भासणार आहे.
पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, ते कामावर असताना त्यांना फावल्या वेळात व्यायाम करता यावा, यासाठी सर्व १३ डेपोंमध्ये
व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी मदत म्हणून प्रत्येकी ३ हजार रुपयांची मदत देण्याच्या निर्णयास मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर कामावर असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला एक लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. त्यासाठी पीएमपीकडून स्वतंत्र मृत्युफंड उभारला जात आहे. कामगार संघटनांची वर्गणी कामगारांच्या वेतनातून कापून घेण्यासही संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.
(प्रतिनिधी)
अनुकंपाखालील भरतीची मुदत ३ वर्षांपर्यंत
-पीएमपीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरीवर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना अनुकंपा तत्त्वाखाली एक वर्षाच्या आत भरती होणे बंधनकारक होते. मात्र अनेक कर्मचाऱ्यांची मुले लहान असल्याने त्यांना अनुकंपा तत्त्वाचा न्याय मिळत नव्हता.
त्यामुळे अनुकंपाखाली ३ वर्षांपर्यंत भरती होता येईल, अशी सवलत देण्याचा निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात आला आहे.
एएसआरटीयू संस्थेकडून अनेक शहरातील ट्रान्स्पोर्टला बस भाड्याने दिल्या जातात. अत्यंत कमी दराने या बस पालिकेला भाड्याने मिळणार आहेत. ठेकेदारांकडून मिळणाऱ्या दरापेक्षा एएसआरटीयूचा दर त्या तुलनेत खूपच कमी आहे. एएसआरटीयूने पीएमपीला बस भाड्याने देण्यास संमती दिल्याने त्याचा पालिकेला मोठा फायदा होणार आहे.
गर्दीच्या वेळेत बसची संख्या कमी पडत असल्याने प्रवासी बसमध्ये लोंबकळून चालल्याचे चित्र शहरात दिसून येते. बसच्या संख्येत वाढ झाल्यानंतर हे चित्र बदलण्यास मदत होणार आहे. नव्याने खरेदी करण्यात येत असलेल्या एक हजार बस टप्प्याटप्प्याने पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. भाडेतत्त्वावरील बस येत्या १५ दिवसांत उपलब्ध होणार आहेत.
पीएमपीस मिळणार दरमहा २ लाखांचे उत्पन्न
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ८ ठिकाणच्या जागा १२ वर्षे मुदतीसाठी टेलिकॉम कंपन्यांना मोबाइल टॉवर उभारण्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यातून पीएमपीला दरमहा २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
गणेशोत्सवापर्यंत बसचा ताफा दाखल होणार
पीएमपीकडून १ हजार बसची खरेदी करण्यात येणार आहे, या खरेदीची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील बसचा ताफा गणेशोत्सवापर्यंत (५ सप्टेंबर) पीएमपीमध्ये दाखल होईल, असे प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले. सध्या सर्वत्र मंदीचे वातावरण असून या काळात रास्त दरात बस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी बस खरेदीचे ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे, अशी माहिती जगताप यांनी दिली.
शहरामध्ये बसची संख्या कमी पडत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बसची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात येत होती. बसना जीपीएस बसवून त्या अधिक स्मार्ट करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असताना बसची संख्या कधी वाढणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.