जुन्या रिंग रोडबाबत आज महापालिकेत बैठक
By Admin | Updated: September 4, 2015 02:19 IST2015-09-04T02:19:34+5:302015-09-04T02:19:34+5:30
तब्बल २७ वर्षे रेंगाळलेल्या शहराभोवतीच्या जुन्या रिंग रोडचे काम (हाय कपॅसिटी मास्ट ट्रान्झिस्ट रोड, एचसीएमटीआर) आता टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्या निर्णयावर प्रशासन आले आहे

जुन्या रिंग रोडबाबत आज महापालिकेत बैठक
पुणे : तब्बल २७ वर्षे रेंगाळलेल्या शहराभोवतीच्या जुन्या रिंग रोडचे काम (हाय कपॅसिटी मास्ट ट्रान्झिस्ट रोड, एचसीएमटीआर) आता टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्या निर्णयावर प्रशासन आले आहे. उद्याच (शुक्रवार) या रस्त्याच्या संदर्भात महापालिकेत बैठक होत असून, त्यात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
खर्च करण्याची महापालिकेची क्षमता नसल्यामुळे या कामाकडे पदाधिकारी व प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले. मात्र आता शहरातील वाहतुकीची समस्या वाढल्यामुळे या रस्त्याच्या कामावर चर्चा होऊ लागली आहे. या विशेष प्रकल्पाची जबाबदारी असलेले ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले, की भूसंपादनाबाबत अनेक कायदे आहेत. त्यानुसार खासगी किंवा सरकारी मालकीचीही जागा संपादन करायची असेल तर महसूल विभागाकडे तेवढे पैसे जमा करावे लागतात. या कायद्यानुसार फक्त जागा संपादनासाठी म्हणून महापालिकेला काही कोटी रुपये महसूल विभागाकडे द्यावे लागतील. ते शक्य नसल्यामुळेच इतकी वर्षे याकडे लक्ष दिले गेले नाही. काही पदाधिकाऱ्यांनी महापालिकेला यात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र एखाद्या महापालिकेसाठी असा वेगळा निर्णय शक्य नसल्यामुळे त्यावर निर्णय झाला नसावा. त्यात हे काम रेंगाळले गेले.
मात्र तरीही प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे एकूण जागेपैकी २१ टक्के क्षेत्र आता महापालिकेच्या ताब्यात आहे. कायद्यात आता काही बदल झाला असून, त्यानुसार महापालिका स्वतंत्रपणे जागा मालकांशी चर्चा करून जागा संपादन करून घेऊ शकते.
त्यात जागामालकाला जादा एफएसआय देणे, विकास हस्तांतरण कायद्यानुसार दुसऱ्या ठिकाणी त्याला जागा देणे किंवा तडजोड करून सरकारी दरापेक्षा काही टक्के रक्कम जादा देणे असे तीन पर्याय आहेत. त्यामुळे महापालिकेने अलीकडे या रस्त्याच्या कामासाठी संपादन कराव्या लागणाऱ्या सर्व जागांचे सर्व्हे क्रमांक देऊन जागामालकांना महापालिकेशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती बकोरिया यांनी दिली.
दरम्यान, या रस्त्याचे काम सुरू व्हावे यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करणारे उपमहापौर आबा बागूल यांनी, प्रशासनाने आता अधिक दिरंगाई न करता कामाला सुरुवात करावी, असे आवाहन केले. एकूण ३४ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याची सध्या ज्या क्षेत्रात जेवढी जागा उपलब्ध आहे, तिथे काम सुरू करायला हवे. साधारण १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम सध्या काही जागांचा अपवाद वगळता सुरू होऊ शकते. मात्र त्यासाठी हवा तेवढा दबाव येत नसल्यामुळेच प्रशासन लक्ष देत नाही. (प्रतिनिधी)