विद्यार्थ्यांचेही साहित्य संमेलन
By Admin | Updated: January 23, 2015 23:58 IST2015-01-23T23:58:17+5:302015-01-23T23:58:17+5:30
विद्यार्थ्यांमध्ये साहित्य संस्कृती रुजावी, तरुण लेखकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचा साहित्य मेळा भरविला जाणार आहे.

विद्यार्थ्यांचेही साहित्य संमेलन
राजानंद मोरे- पुणे
विद्यार्थ्यांमध्ये साहित्य संस्कृती रुजावी, तरुण लेखकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचा साहित्य मेळा भरविला जाणार आहे. विद्यापीठामार्फत पुढील महिन्यात तीन दिवसीय राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन भरविण्याचे नियोजित असून, त्याची तयारीही सुरू झाली आहे. राज्यात पहिल्यांदाच खास विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान विद्यापीठाला मिळणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच अन्य साहित्य संमेलनांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही. वास्तविक अनेक विद्यार्थ्यांना साहित्य लेखन तसेच वाचनाची आवड असते. अनेक वेळा केवळ महाविद्यालय किंवा विद्यापीठस्तरीय नियतकालिकांपर्यंत त्यांची प्रतिभा मर्यादित राहते. एकीकडे तरुणांचा साहित्याकडील ओढा कमी होत चालल्याची ओरड अनेक जण करीत असतात; मात्र त्यांच्यात साहित्यविषयक गोडी निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काही साहित्य संस्थांच्या मदतीने खास विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरविण्याचे नियोजन सुरू केले आहे. फेबु्रवारी महिन्यात तीन दिवस हे संमेलन घेण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यांदाच फक्त विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून साहित्य संमेलन भरविले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.
सुमारे २०० विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था विद्यापीठामार्फत केले जाईल. तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि अन्य विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठी संमेलन खुले असणार आहे.
साहित्य क्षेत्रातील तरुण लेखक, कवी यांच्यासह साहित्यात मोठे योगदान दिलेल्या साहित्यिकांना या संमेलनात निमंत्रित केले जाणार आहे. तीन दिवस विद्यार्थ्यांसाठी भरगच्च कार्यक्रमांबरोबरच त्यांना खुले व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरेल.
संमेलनाची प्राथमिक तयारी सुरू झाली असून, लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल.
(प्रतिनिधी)
विद्यार्थी साहित्य संमेलन भरविण्याबाबत महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रस्ताव मिळाला आहे. खास विद्यार्थ्यांसाठी संमेलन भरविल्यास त्याचा विद्यार्थ्यांवर चांगला परिणाम होईल. या प्रस्तावावर प्राथमिक स्तरावर विचार सुरू आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.
- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ