नाराजांच्या मनधरणीसाठी बैठक

By Admin | Updated: June 19, 2015 22:38 IST2015-06-19T22:38:52+5:302015-06-19T22:38:52+5:30

स्वीकृत सदस्यपदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्त्यांकडून अर्ज मागविले होते. या पदावर प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणाऱ्या

A meeting for angry meetings | नाराजांच्या मनधरणीसाठी बैठक

नाराजांच्या मनधरणीसाठी बैठक

पिंपरी : स्वीकृत सदस्यपदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्त्यांकडून अर्ज मागविले होते. या पदावर प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. नाराजांच्या मनधरणीसाठी प्रयत्न करणार आहेत.
महापालिकेत एकमुखी सत्ता असतानाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला. त्यामुळे पक्षाचे स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेते भानावर आले आहेत. अजित पवार यांनी शहराच्या राजकारणात जातीने लक्ष घातले आहे. याचे चित्र स्थायी समिती सदस्य, अध्यक्ष, प्रभाग अध्यक्षपद निवडीत दिसून आले. ‘बंडखोरी खपवून घेणार नाही. यापुढे पक्षाचे काम करणाऱ्यांनाच संधी मिळणार,’ असा संदेश पवार यांनी दिला आहे.
संख्याबळ कमी होऊ नये म्हणून महापालिकेत १२८ पैकी ८४ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. मात्र, चिंचवडचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याने त्याचा फायदा भारतीय जनता पक्षास झाला आहे. चिंचवडमध्ये भाजपाचे वर्चस्व वाढले आहे. तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांच्यासह नाराजांची संख्या जास्त असल्याने, तसेच पिंपरीतही माजी आमदार अण्णा बनसोडे हेही पक्षावर नाराज आहेत. राष्ट्रवादीतील गटातटांचा आणि नाराजीचा फटका पक्षाला बसू नये, तसेच येत्या महापालिका निवडणुकीत महापालिकेतील संख्याबळ कमी होऊ नये, म्हणून बैठक होणार आहे.
सर्वाधिक फ प्रभागातूल इच्छुक स्वीकृत सदस्यपदाची निवडणूक जाहीर नसतानाही पक्षाने अर्ज मागविल्याने निवडणुकीची चर्चा
सध्या रंगली आहे. एकूण १८ कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्यासाठी १६७ इच्छुकांनी अर्ज सादर केलेले आहेत. त्यात पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अ प्रभागातून ३४, ब प्रभागातून २०, क प्रभागातून २८, ड प्रभागातून २१, ई प्रभागातून २१, फ प्रभागातून ३५ अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक इच्छुक फ आणि अ प्रभागातून आहेत.(प्रतिनिधी)

पक्षसंघटनेत प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्या
-बंडखोरी, अंतर्गत गटबाजीचा फटका आजवर पक्षाला बसला आहे. त्यामुळे पक्षसंघटना बांधणीत नेत्यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा कार्यकर्ते करू लागले आहेत. शहराध्यक्ष निवडीनंतर प्रभाग अध्यक्ष, विविध सेल, युवक अध्यक्ष निवडी करताना, तसेच आजवर पक्षाचे काम करणाऱ्यांनाच स्वीकृत सदस्यपदावर संधी द्यावी. गटबाजीला थारा देऊ नये, अशीही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
नेत्यांचे झिजवू लागले उंबरठे
-स्वीकृत सदस्यपदाचे अर्ज मागविल्याने कार्यकर्ते आपलीच वर्णी लागावी, यासाठी स्थानिक नेत्यांचे उंबरे झिजवू लागले आहेत. स्वत:ची कार्यासंदर्भातील माहिती, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची शिफारसपत्रे, फोटो, वृत्तपत्रांची कात्रणे असा अहवाल तयार करून नेत्यांकडे देत आहेत. मीच कसा योग्य आहे, हे पटवून देत आहेत. आता फक्त अर्ज मागविले आहेत. अजून निवडीची प्रक्रिया सुरू झालेली नाही, प्रक्रिया सुरू झाल्यावर विचार करू, असे नेते इच्छुकांना सांगत आहेत.

Web Title: A meeting for angry meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.