सहकारनगर येथील डॉ. विनया दीक्षित यांनी हा उपक्रम सुरू केला होता. सर्व मैत्रिणींनी सोबत घेऊन रोप भिशी सुरू केली. त्याचा पहिला वर्धापन दिन एकत्र येऊन साजरा करण्यात आला.
सदाशिव पेठेत राहणाऱ्या सीमंतिनी वझे यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. मातीविरहित, नैसर्गिक उपलब्ध गोष्टी वापरून भाजी, फळं आणि फुले कशी रुजवली आणि जोपासली हे अतिशय सुंदरपणे त्यांनी सांगितले. वाळलेली पाने, उसाची चिपाडे, घरगुती ओला कचरा, राख इ. विविध गोष्टी कशा प्रकारे वापरू शकतो, हे देखील त्यांनी सांगितले. त्यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. या वेळी विविध औषधी वनस्पती, फुलांची रोपे आणि शोभेच्या रोपांची देवघेव झाली. या पावसाळ्यात हिरवाईमध्ये भर घालू असा निर्धार त्यांनी केला.
-----------------
आपल्या सगळ्यांकडे तुळस असते. काही लहान-मोठी झाडं जागेच्या उपलब्धतेनुसार असतात. पण एकदा का बागकामाचा किडा चावला, तर नकळत आपली बोटं हिरवी होतात. जळीस्थळी काष्ठीपाषाणी झाडंच दिसू लागतात. हळूहळू आपल्याकडची झाडांची लोकसंख्या वाढायला लागते. हे मुके जीव काहीही न बोलता बरंच काही शिकवतात. त्यांच्या प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे वागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम शिकवतात. अनेक जीव आपल्या बागेत सुखाने नांदू लागतात, त्यांची ओळख होते. समविचारी मैत्रिणी भेटल्या की, मग तर विचारायलाच नको. या भिशीमुळे हिरवाईचे दूत म्हणून काम केल्याचा आनंद मिळत आहे.
- अनुराधा नांदुरकर, भिशी सदस्य
------------------