अ‍ॅलोपॅथी-आयुर्वेद एकत्र आल्यास वैद्यकीय क्रांती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:11 IST2020-12-06T04:11:09+5:302020-12-06T04:11:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र’ आणि ‘शालाक्यतंत्र’ या नावाखाली ...

Medical revolution is possible if Allopathy-Ayurveda come together | अ‍ॅलोपॅथी-आयुर्वेद एकत्र आल्यास वैद्यकीय क्रांती शक्य

अ‍ॅलोपॅथी-आयुर्वेद एकत्र आल्यास वैद्यकीय क्रांती शक्य

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र’ आणि ‘शालाक्यतंत्र’ या नावाखाली असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनने या अधिसूचनेला विरोध केल्याने अ‍ॅलोपथी विरुध्द आयुर्वेद असा वाद निर्माण झाला आहे. व्यावसायिक हेतूने या निर्णयाला विरोध केला जात असल्याचे मत आयुर्वेदतज्ज्ञांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे खेडोपाडी आरोग्य सेवा पोहोचवणे शक्य होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. श्रीकांत काशीकर म्हणाले, ‘आयुर्वेदाचे डॉक्टर अनेक वर्षांपासून शस्त्रक्रिया करत आहेत. महाराष्ट्रात पूर्वीपासूनच शस्त्रक्रियांना परवानगी आहे. मी स्वत: गेली २८ वर्षे विविध शस्त्रक्रिया करत आलो आहे. कोणतेही नवीन तंत्रज्ञान ही विज्ञानातील क्रांती असते. सुश्रुतसंहितेमध्ये शस्त्रक्रियांचा सर्वप्रथम उल्लेख झाला. त्यामध्ये प्लास्टिक सर्जरीचाही उल्लेख आहे. बँडेजचे विविध प्रकार त्यात सांगितले आहेत. आयुर्वेदामध्ये एमएस सर्जरीची पदवी घेणा-या डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी पूर्वीपासूनच आहे. विज्ञान आधुनिक होत असताना ‘हे तुमचे, ते आमचे’ असा फरक करता येत नाही. प्रत्येक शाखेच्या आपापल्या मर्यादा असतात. त्यामुळे दोन्ही शाखांनी एकत्र येऊन काम करणे वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने मोठा बदल ठरेल.’

------------------------

आयुर्वेद उपचारांना विमा कवच मिळावे

आयुर्वेदात शस्त्रक्रियेचा उल्लेख ४००० वर्षांपूर्वीपासून आहे. मूळव्याध आणि भगंदरसाठी केली जाणारी क्षारसूत्र उपचारपध्दती हा शस्त्रक्रियेचाच एक भाग आहे. आयुर्वेदातील उपचार आरोग्य विम्याअंतर्गत समाविष्ट व्हावेत, यासाठी मी गेल्या दोन वर्षांपासून आयुष मंत्रालयाशी, पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कात आहे. आयुर्वेदामध्ये एमएस या अभ्यासक्रमात एमबीबीएसप्रमाणेच ट्रेनिंग, इंटर्नशिप आहे. आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना देण्यासाठी मंत्रालयाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. आयुर्वेद उपचारपध्दती आरोग्य विम्याअंतर्गत समाविष्ट केल्यास लोक या शाखेकडे जास्त प्रमाणात वळू शकतील. क्षारसूत्र उपचारपध्दतीला विमा कवच देण्याची प्रक्रिया सुरु असून मार्गदर्शक तत्वे लवकरच जाहीर केली जातील, असे आयुष मंत्रालयाने कळवले आहे.

- डॉ. प्रसाद बापट, आयुर्वेदतज्ज्ञ

Web Title: Medical revolution is possible if Allopathy-Ayurveda come together