वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

By Admin | Updated: April 5, 2016 01:02 IST2016-04-05T01:02:09+5:302016-04-05T01:02:09+5:30

लहान मुलांना देण्यात येणारी ट्रायवॅलंट ओरल पोलिओ व्हॅक्सिन (टीओपीव्ही) ही लस बंद होऊन आता बायवॅलंट ओरल पोलिओ व्हॅक्सिन (बीओपीव्ही) ही लस येणार आहे

Medical officers training | वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

पुणे : लहान मुलांना देण्यात येणारी ट्रायवॅलंट ओरल पोलिओ व्हॅक्सिन (टीओपीव्ही) ही लस बंद होऊन आता बायवॅलंट ओरल पोलिओ व्हॅक्सिन (बीओपीव्ही) ही लस येणार आहे. त्याचबरोबर इंजेक्टेबल पोलिओ लस येणार आहे. या सर्व गोष्टींची विस्तृत माहिती आणि प्रशिक्षण देण्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यामध्ये १६२ डॉक्टर आणि ७५ नर्सेसनी सहभाग घेतला होता.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सूचनांनुसार लसीकरण मोहिमेमध्ये हे बदल करण्यात आले असून, येत्या काही दिवसांतच पालिकास्तरावर त्याची अंमलबजावणी होणार आहे. पोलिओ लसीमध्ये टाईप १, २ आणि ३ अशा तीन व्हायरसचा समावेश असतो. मात्र जागतिक स्तरावर आता टाईप २ व्हायरसचे निर्मूलन झाल्याने टाईप १ व ३ असलेली नवी लस देण्यात येणार आहे. त्यामुळे या नवीन लसीबाबत डॉक्टरांना माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे महापालिकेच्या लसीकरण अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले. तसेच पोलिओ लस आता तोंडावाटे देण्यात येणार नसून ती इंजेक्शनद्वारे देण्यात येणार असल्याने त्याचीही माहिती यामध्ये देण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एपीएस नरुला यांनी या वेळी नव्याने आलेल्या लसीकरणाबाबत उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. केंद्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार या उपक्रमाची सुरुवात पुण्यामध्ये २५ एप्रिलपासून होणार असल्याचेही डॉ. बळीवंत यांनी सांगितले. त्याआधी टीओपीव्ही ही लस संपविणे आवश्यक असून त्यानंतर मात्र बीओपीव्ही लस कुठेही उपलब्ध होणार नसल्याचे त्या म्हणाल्या. २५ एप्रिलनंतर कोणत्याही ठिकाणी टीओपीव्ही लसीचा साठा आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Medical officers training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.