बारामती : जन्मताच उपेक्षित जगणं नशिबी आलेलं. त्यातून उपजीविकेसाठी गावोगावी, शहरातील भटकंती वाट्याला आली. परंतु, शेवटी आपल्याच गावात राहून, वाड्यावस्त्यांवर फिरून भंगार गोळा करण्याचा व्यवसाय सुरू केला. कमाई तुटपुंजी होती. गरजा कमी असल्याने त्यात भागतही होतं. सगळं सुरळीत चालू असताना आत्मिक समाधान मात्र मिळत नव्हतं. शाळेत रस नसल्याने शिक्षण नववीतूनच सोडून दिलं. खरं ज्ञान मिळवण्याची आंतरिक शक्ती गप्प बसू देत नव्हती. ‘जन्मून झगडणारी आणि तत्त्वाला अनुसरून लढणारी जी पिढी निर्माण होते, तीच ज्ञान मिळवू शकते.’ या उक्तीनुसार स्वत:च ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न सुरूकेला. त्यासाठी संतसाहित्याचा आणि अध्यात्माचा अभ्यास सुरू केला. हळूहळू जमू लागलं आणि आत्तापर्यंत आपण भोगलेल्या यातनांना शब्दबद्ध करण्यासाठी धडपडू लागलो. त्यातूनच २००४ साली माझं आत्मचरित्र प्रकाशित झालं. ‘मोजमाप’ हे त्याचे नाव. एक भंगारवाल्याचा लेखक, व्याख्याता झालो. याचं समाधान मला वाटतं, असे सवणे सांगत होते.इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावी राहणारा हा अवलिया. राहुल सवणे हे त्यांचे नाव. आजही लासुर्णेनजीकच्या वाड्यावस्त्यांवर फिरून भंगार गोळा करण्याचा व्यवसाय सवणे करतात. अध्यात्माचा आणि संतसाहित्याचा त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यावरील प्रभुत्वाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रभर २ हजारांच्यावर व्याख्याने दिली आहेत. विज्ञान, विधी, वाणिज्य, डी.एड., बी.एड., पोलीस ट्रेनिंग सेंटर, फार्मसी, कृषी तंत्रनिकेतन आदी प्रकारच्या महाविद्यालयांत व्याख्याने दिली. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, औरंगाबादसह महाराष्ट्रभर व्याख्यानांसाठी राहुल सवणे फिरत असतात. कोणी जन्मताच मोठा असतो, तर कोणाला मोठेपणासाठी झगडावे लागते, तर कोणाला मोठेपण बहाल केले जाते. परिस्थितीशी झगडून मिळवलेले यश माणसाचे कर्तृत्व उजळून काढते. त्यासाठी ज्ञान हाच पाया आहे, असेही सवणे सांगतात. भंगाराचा व्यवसाय करत असतानाच मुलांना उच्चशिक्षण देण्याचेही स्वप्न सवणे यांनी पाहिले होते. त्यांचा मोठा मुलगा सचिन हा आयटी क्षेत्रातील अभियंता आहे, तर सचिनची पत्नी पुणे येथील वाडिया महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. तुटपंज्या कमाईवर भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या सवणे यांनी समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे. गावालाही त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सार्थ अभिमान आहे. सवणे यांनी फलटण तालुक्यातील मुधोजी महाविद्यालयात ‘गुरू-शिष्य नाते’ या विषयावर व्याख्यान दिले. या कार्यक्रमास प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य शिवाजीराव भोसले हजर होते. सवणे यांनी विषयाची केलेली मांडणी आणि भाषेवरील प्रभुत्व पाहून शिवाजीराव भोसले यांनी त्यांचे कौतुक केले. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केलेले कौतुक माझ्यासाठी विशेष होते, अशी आठवण सवणे अभिमानाने सांगतात.
भंगार गोळा करताना सापडले आयुष्याचे ‘मोजमाप’
By admin | Updated: October 24, 2014 05:06 IST