मयूरेश्वराची यात्रा मंगळवारपासून, दर्शनासाठी मंदिर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST2021-09-06T04:13:36+5:302021-09-06T04:13:36+5:30

अष्टविनायक आराध्यदैवत मोरगाव येथील भाद्रपद यात्रा उत्सव दर वर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी या दरम्यान संपन्न होतो. ...

Mayureshwar Yatra from Tuesday, temple closed for darshan | मयूरेश्वराची यात्रा मंगळवारपासून, दर्शनासाठी मंदिर बंद

मयूरेश्वराची यात्रा मंगळवारपासून, दर्शनासाठी मंदिर बंद

अष्टविनायक आराध्यदैवत मोरगाव येथील भाद्रपद यात्रा उत्सव दर वर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी या दरम्यान संपन्न होतो. या दरम्यान सर्वधर्मीयांना श्रींच्या मुख्य मूर्ती गाभाऱ्यात जाऊन अभिषेक-पूजा व मूर्तीस्नान घालता येत असल्याने राज्यासह परराज्यातून भक्त मोरगावला येतात. येथे कऱ्हा नदीकाठी काशीसमान असलेल्या गणेशकुंडात अंघोळ करून मयूरेश्वरास व द्वार मंदिर ठिकाणी अनवाणी चालत जाऊन दुर्वा वाहण्याची विशिष्ट अशी प्रथा आहे. यासाठी राज्यासह परराज्यातून भक्त दर वर्षी मोरगावला येत असल्याने येथे भाविकांची तुडुंब गर्दी असते. परंतु कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने यात्रेकाळात केवळ परंपरेने चालत आलेले धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. उत्सवानिमित्त मंगळवार दि. ७ ते गुरुवार दि.९ पर्यंत मयूरेश्वर व सिद्धिबुद्धीस भरजरी पोशाख व हिरे, माणिक, मोतीयुक्त सुवर्णाअलंकार चढविले जाणार आहेत. मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती पालखी सोहळा चिंचवड येथून मुख्य विश्वस्त मंदार देव यांच्या उपस्थितीत गाडीद्वारे दि. ९ रोजी येणार आहे. यानंतर मंगलमूर्ती व मयूरेश्वर भेट सोहळा संपन्न होणार असून पुढील तीन दिवस केवळ धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

-----------------------

कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भक्तांनी मंदिर व परिसरात गर्दी करू नये. तसेच गणपतीपूजन आपल्या घरी करावे व प्रशासनाला सहकार्य करावे.

- नीलेश केदारी,

सरपंच ग्रामपंचायत, मोरगाव

Web Title: Mayureshwar Yatra from Tuesday, temple closed for darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.