पवनानगर : व्हॅलेंटाइन डे जवळ येत असताना मावळ तालुक्यात गुलाब उत्पादकांची लगबग वाढली आहे. अनेक देशांत येथील दर्जेदार गुलाब निर्यात सुरू झाली आहे.पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फूल उत्पादन होणाऱ्या मावळ तालुक्यात २५० हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाऊस शेती आहे. त्यातील २२५ हेक्टर क्षेत्रावर गुलाब पिकवला जातो. २५ हेक्टर क्षेत्रावर जरबेरा कार्नेशन व इतर भाजीपाला पिके घेतली जातात. व्हॅलेंटाइन डे काळात मोठी मागणी असल्याने परदेशातही येथील फुले मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. यामध्ये जपान, इंग्लड, फ्रान्स, हॉलंड, आॅस्ट्रेलिया, दुबई आदी देशांत मोठी मागणी असते. ३० जानेवारी ते ८ फेब्रुवारी या काळात गुलाब परदेशात निर्यात केले जातात. निर्यातक्षम फूल उत्पादनासाठी शेतकरी दोन महिने अगोदरच तयारी सुरू करत असतो. १ ते १० डिसेंबरच्या कालावधीमध्ये झाडांची कटिंग व बेंडिंग केली जाते. फुले निर्यात करुन परदेशी चलन मिळवून देण्यात आमचा देशाला हातभार लागतोय याचे समाधान आहे. फुले उत्पादनासोबतच त्यांची चांगली काळजी घ्यावी लागते. पॉलीहाऊसमध्ये फुले उत्पादन घेणाऱ्या व परदेशात फुले पाठवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे शीतगृह असणे गरजेचे आहे. फुले निर्यातीसाठी शेतकरी एकत्र आले पाहिजेत व छोटी शीतगृहे उभारली तरच चांगल्या प्रतीच्या फुलांना परदेशात आणखी मागणी वाढेल. - ज्ञानेश्वर ठाकर, फूलउत्पादक
मावळचा गुलाब निघाला फॉरेनला
By admin | Updated: February 6, 2017 06:16 IST