तळजाई जैवविविधता उद्यानाचा मास्टरप्लॅन मान्यतेसाठी स्थायीसमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST2021-09-19T04:11:04+5:302021-09-19T04:11:04+5:30
पुणे : तळजाई टेकडीवरील हिल टॉप हिल स्लोपवरील बहुचर्चित व नियोजित असलेला जैवविविधता उद्यान उभारण्याचा मास्टर प्लॅन तयार झाला ...

तळजाई जैवविविधता उद्यानाचा मास्टरप्लॅन मान्यतेसाठी स्थायीसमोर
पुणे : तळजाई टेकडीवरील हिल टॉप हिल स्लोपवरील बहुचर्चित व नियोजित असलेला जैवविविधता उद्यान उभारण्याचा मास्टर प्लॅन तयार झाला आहे. हा प्रस्ताव येत्या मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर प्रशासनाकडून मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.
सात उद्यानांचे सेंट्रल पार्क, जॉगिंग ट्रॅक व सायकल ट्रॅक, हरित स्कूल, पक्षी निरीक्षण, खुले ॲम्फी थिएटर. आदी सुविधा असलेल्या या उद्यानासाठी सुमारे १२० कोटी रुपये खर्च येणार आहे. पर्यावरणप्रेमींचा विरोध आणि स्थानिक नगरसेवकांमधील संघषार्मुळे मागील तीन वर्षांपासून हा प्रकल्प मोठा चर्चिला गेला आहे.
तळजाई टेकडीवरील हिल टॉप हिल स्लोपचे आरक्षण असलेली सुमारे १०० एकर जमीन न्यायालयीन लढ्यानंतर महापालिकेच्या ताब्यात आली आहे. यापैकी बहुतांश जमिनीचे संपादन झाले असून, अद्याप काही जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, कोरोना आपत्ती कमी झाल्यावर आता कुठे हा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. या जैवविविधता उद्यानास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेने आवश्यक मान्यता दिल्यास शासन मदत करेल, असे आश्वासन यापूर्वीच दिले आहे. त्यामुळे या प्रस्तावाला येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----------------------