पुणे: बीडच्या मस्साजोग येथील सरपंत संतोष देशमुख हत्या प्रकरण आता गृहखात्याकडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात आरोपींना शिक्षा केली जाईल असा शब्द दिला आहे, त्यामुळे आता या प्रकरणावर मी काहीच बोलणे योग्य नाही, मी त्या हत्येचा निषेधच केला आहे असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. आरोपपत्रात काय लिहिले आहे याची काहीही माहिती नाही असे त्या म्हणाल्या.
पशुसंवर्धन आयुक्तालयात एका कार्यक्रमासाठी आल्या असताना मुंडे यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. त्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर काहीही बोलणे त्यांनी टाळले. पुण्यात आहे तर पुण्यातील घटनांविषयी विचारा असे त्या म्हणाल्या. त्या प्रकरणात माझ्याकडे कसलीही माहिती नाही. आरोपींवर योग्य ती कारवाई होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यांच्यावर माझा विश्वास आहे, ते एकदा यासंबधात बोलल्यानंतर मी बोलणे योग्य वाटत नाही असे त्यांनी सांगितले.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरील प्रकाराचा त्यांनी निषेध केला. नांदेडमध्येही अशीच घटना घडली. संपूर्ण राज्यात असे प्रकार होत आहेत. त्याचाही मुंडे यांनी निषेध केला. अशा प्रकरणात पोलिसांनी त्वरीत कारवाई करून तपास करणे गरेजेचे असते असे मत त्यांनी व्यक्त केले.
वाल्मीक कराड याच्या अडचणी वाढल्या
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले आहेत. या हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. तर दुसरीकडे देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रानुसार वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप पत्रात म्हटले आहे. तर कराड याच्याविरोधात पुरावे मिळाल्याचे आरोप पत्रात म्हटले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांनी जबाब दिले आहे, यामुळे आता वाल्मीक कराड याच्या अडचणी वाढल्या आहेत.