मसापची निवडणूक प्रक्रिया घटनाबाह्य
By Admin | Updated: December 24, 2015 00:37 IST2015-12-24T00:37:59+5:302015-12-24T00:37:59+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा ठपका परिषदेचे कायदे सल्लागार अॅड. प्रमोद आडकर यांनी ठेवला आहे.

मसापची निवडणूक प्रक्रिया घटनाबाह्य
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा ठपका परिषदेचे कायदे सल्लागार अॅड. प्रमोद आडकर यांनी ठेवला आहे. मतदार याद्या निवडणूक निकालाच्या तीन महिने अगोदर देणे आवश्यक होते; पण तसे झालेले नाही. त्यामुळे निवडणुकीची फेररचना करावी, अशा आशयाचे निवेदन त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिले आहे.
पत्रकार परिषदेत आडकर म्हणाले, ‘परिषदेच्या घटनेप्रमाणे कलम ११ऊ नुसार निवडणूक निकालाच्या अगोदर तीन महिने मतदार याद्या कार्यकारी मंडळाने निश्चित व जाहीर करून निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणे आवश्यक होते; पण आठ दिवस उशिराने याद्या दिल्या आहेत. परिषदेच्या कार्यकारी मंडळाने यादी संमत करून दिल्यानंतर याद्या द्याव्या लागतात. याचे सूचक, अनुमोदक कोण, याचीही माहिती द्यावी लागते. १५ डिसेंबरपर्यंत मतदार याद्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक होते.’
ते म्हणाले, ‘कार्याध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह यांनी वेळेत बैठक घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. सभा दि. १५ ऐवजी २१ डिसेंबरला बोलाविली गेली. या बैठकीला कायदे सल्लागार या नात्याने मला बोलाविणे आवश्यक होते; पण मला बैठकीचा निरोप दिला नाही.’
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांना पत्र दिले आहे. त्याची प्रत अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. भास्करराव आढाव, कार्यकारी विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, विश्वस्त उल्हास पवार यांना दिल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)