विवाहितेचा विनयभंग, दंतवैद्याला एक वर्षाची शिक्षा

By Admin | Updated: February 15, 2017 01:55 IST2017-02-15T01:55:47+5:302017-02-15T01:55:47+5:30

दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या अठरा वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्यावरून येथील दंतवैद्य डॉ. समीर गणपत भिसे

Marriage mauling, Dentist get one year's education | विवाहितेचा विनयभंग, दंतवैद्याला एक वर्षाची शिक्षा

विवाहितेचा विनयभंग, दंतवैद्याला एक वर्षाची शिक्षा

राजगुरुनगर : दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या अठरा वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्यावरून येथील दंतवैद्य डॉ. समीर गणपत भिसे (वय ३३ वर्ष, रा. राजगुरुनगर) याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. कातकर यांनी एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
ही घटना १९ मे २०१२ रोजी दुपारी एक वाजता घडली होती. आरोपी भिसे याचा राजगुरुनगर येथील मोमीनआळीमध्ये दातांचा दवाखाना आहे. दाढ दुखते म्हणून पीडित विवाहिता आपल्या बारा वर्षीय लहान बहिणीबरोबर तपासणीसाठी दवाखान्यामध्ये आली होती. त्या वेळी दवाखान्यामध्ये आरोपीव्यतिरिक्त कोणीही नव्हते. आरोपीने पीडित विवाहितेला तपासणी कक्षामध्ये नेले आणि लहान बहिणीला बाहेर बसविले. तपासणी करीत असताना आरोपी डॉक्टरने पीडित विवाहितेशी मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले व हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्याकडे बघून घेईन, अशी धमकी दिली. पीडित विवाहिता घाबरून बाहेर आली आणि बहिणीला घेऊन घरी गेली. त्याचदिवशी राजगुरुनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
न्या. एस. जे. कातकर यांच्यापुढे सुनावणी झाली असता पीडित विवाहितेची व लहान बहिणीची साक्ष झाली.
या दोन्हीही साक्ष ग्राह्य धरून न्या. कातकर यांनी भादंवि कलम ३५४ नुसार आरोपीला एक वर्ष तुरुंगवास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून तीन हजार रुपये पीडित महिलेला भरपाई देण्यात येणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. रजनी नाईक यांनी काम पाहिले. (वार्ताहर)

Web Title: Marriage mauling, Dentist get one year's education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.