नाताळच्या खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज

By Admin | Updated: December 24, 2015 00:51 IST2015-12-24T00:51:58+5:302015-12-24T00:51:58+5:30

केकच्या दुकानाबाहेर स्वागतासाठी उभे असलेले सांताक्लॉज, केकच्या आॅर्डरसाठी लागलेल्या रांगा, चौका-चौकांत सांताक्लॉजच्या टोप्यांचे स्टॉल, त्याकडे कुतूहलाने पाहणारे चिमुरडे,

Markets ready for Christmas shopping | नाताळच्या खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज

नाताळच्या खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज

पुणे : केकच्या दुकानाबाहेर स्वागतासाठी उभे असलेले सांताक्लॉज, केकच्या आॅर्डरसाठी लागलेल्या रांगा, चौका-चौकांत सांताक्लॉजच्या टोप्यांचे स्टॉल, त्याकडे कुतूहलाने पाहणारे चिमुरडे, असे चित्र शहराच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळत आहे. फर्ग्युसन रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, कॅम्प परिसरसह अनेक भागांमधील बाजारपेठांना उत्सवी स्वरूप आले आहे.
नाताळ हा लहानग्यांच्या जिव्हाळ्याचा सण. शाळेला सात-आठ दिवसांची सुटी असल्याने सर्वांच्याच उत्साहाला उधाण आलेले असते. त्यामुळे सुटीच्या दिवशी बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखले जातात. सांताच्या टोप्यांशिवाय त्यांची हौस पूर्ण तरी कशी होणार? मग, दोन दिवस आधीपासूनच खरेदीची लगबग सुरू होते. शाळांमध्येही नाताळची पार्टी आयोजित केलेली असते. त्यासाठी छानसा ड्रेस, केक किंवा पेस्ट्री, चांदण्या-मोती लावलेल्या सांताच्या टोप्या अशा विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये लगबग दिसते.
घराच्या; तसेच ख्रिसमस ट्रीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू, चांदण्या, चॉकलेट्स, झालर, बेल्स, येशू ख्रिस्त, सांताक्लॉज यांच्या छोट्या मूर्ती, असे नानाविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. टोप्या २० रुपयांपासून, तर मुखवट्यांची किंमत ६० रुपयांपासून सुरू होते.
केकच्या दुकानांमध्ये केकच्या आॅर्डर घेतल्या जात आहेत. त्यासाठी नमुना म्हणून सांता, क्रिसमस ट्री अशा विविध डिझाइनचे केक, पेस्ट्री उपलब्ध आहेत. बाजारपेठांच्या बाहेर सांताक्लॉजच्या वेशभूषेतील माणसे ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.
दुचाकी रॅली
जिंगलबेल...जिंगलबेल..या गाण्याच्या सूरात आणि सांताक्लॉजच्या पोषाखात पुणे शहराच्या विविध भागांमधून आज नाताळ सणाच्या निमित्ताने दुचाकी रॅली काढण्यात आली. ख्रिस्ती युवक प्रार्थना मंडळाच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात नेहरू मेमोरिअल हॉल येथून झाली आणि क्वार्टर गेट चर्च या ठिकाणी समारोप झाला. या रॅलीमध्ये चिमुकल्यांना चॉकलेट, पुस्तके, बॅग विविध प्रकारची खेळणी वाटण्यात आली. सॅन्ताक्लॉजला पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी होत होती. सॅन्ताक्लॉज सोबत फोटो, सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरला नाही.

Web Title: Markets ready for Christmas shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.