झेंडू फेकला रस्त्यावर
By Admin | Updated: October 30, 2016 02:47 IST2016-10-30T02:47:44+5:302016-10-30T02:47:44+5:30
दरवर्षी दसरा आणि दिवाळी सणाला नगदी उत्पन्न देणाऱ्या झेंडूने (गोंडा) यंदा मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. बाजारभाव न मिळाल्याने उत्पादकांनी झेंडू अक्षरश: फेकून दिला.

झेंडू फेकला रस्त्यावर
जेजुरी : दरवर्षी दसरा आणि दिवाळी सणाला नगदी उत्पन्न देणाऱ्या झेंडूने (गोंडा) यंदा मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. बाजारभाव न मिळाल्याने उत्पादकांनी झेंडू अक्षरश: फेकून दिला. तसेच फटाकाविक्री करणाऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे.
दसरा आणि दिवाळी सणाला हमखास नगदी उत्पन्न देणारे पीक म्हणजे झेंडू. या भागात झेंडूला गोंडा म्हणूनच संबोधले जाते. जिरायती जमीन आणि कमी पावसावर येणारे हे पीक सणासुदीला मोठे नगदी उत्पन्न देत असल्याने पुरंदर तालुक्यात झेंडूची मोठी लागवड होते. यंदा तर पावसाने जेजुरी परिसराला हुलकावणीच दिली असली, तरी ही जेजुरी, कोथळे, रानमळा, धालेवाडी, दौंडज, पिंगोरी आदी भागात झेंडूची मोठी लागवड झाली होती. बाजारात गावरान व कलकत्ता जातीच्या झेंडूला ३ ते ५ रुपये, गोल्डन जातीचा ५ ते ७ रुपये, येरो गोल्ड जातीच्या झेंडूला ८ ते १० रुपये किलोचा बाजारभाव मिळाल्याने शेतकरी निराश झाले होते. यातच झेंडू फुलाच्या पोत्याचे वजन करण्यासाठी १० रुपये, नगरपालिकेचा पोत्याला १० रुपये कर द्यावा लागत असल्याने झेंडू तोडून विक्रीला आणण्याचाही खर्च निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी झेंडू फेकून दिला. फटाका विक्रीवरही मोठा परिणाम झाल्याचे विक्रेते गणेश गाढवे, बाळासाहेब लेंडे, उमेश गायकवाड, अनिल पोकळे, बबलू मुदलियार यांनी सांगितले. कालपासून समोरच झेंडूचा बाजार भरला आहे. मात्र बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी येथेच झेंडू फेकून देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्ही फटाके स्टॉल जागाभाडे, परवानगी आदीसाठी सुमारे १५ ते वीस हजार खर्च केले. लाखो रुपयांची गुंतवणूक केली, मात्र हा खर्चही निघेल की नाही, अशीच परिस्थिती असल्याचे स्टॉलधारकांनी सांगितले.
पदरी केवळ निराशा
दसऱ्याला झेंडूने चांगला हातभार दिल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी झेंडू दिवाळी सणासाठी राखून ठेवला होता. मात्र बाजारात त्यांची मोठी निराशाच झाली. कालपासून येथे झेंडूचा बाजार भरला असून बाजारात झेंडूची मोठी आवक झाली होती. झेंडू खरेदीला बाहेरगावाहून येणारे व्यापारीही कमीच होते. बाजारभाव अत्यंत कमी राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली.
फटाक्याकडे पाठ
झेंडूच्या बाजारावर सणासुदीचे अर्थकारण येत असल्याने झेंडू बाजारालगतच असणाऱ्या फटाके स्टॉलवरही मोठा परिणाम जाणवला. शेतकरी झेंडूच्या विक्रीनंतर हमखास फटाके खरेदी करतात. यंदा मात्र शेतकरी फटाके स्टॉलकडे फिरकलेच नाहीत.
झेंडूचं बारदान तरी
यावं कामाला
किमान झेंडूचे बारदान तरी कामाला येईल, हीच माफक आशा असून यंदाची दिवाळी गोड झाली नसल्याच्याच प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बाजारभावाचा अंदाज घेऊन झेंडू बाजारातच आणला नाही.