अनेकांच्या बेतले जिवावर
By Admin | Updated: August 14, 2014 04:36 IST2014-08-14T04:36:44+5:302014-08-14T04:36:44+5:30
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी मोटारीत भरणे, टप्पा वाहतुकीस परवानगी नसतानाही राजरोसपणे अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणे

अनेकांच्या बेतले जिवावर
मंगेश पांडे, पिंपरी
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी मोटारीत भरणे, टप्पा वाहतुकीस परवानगी नसतानाही राजरोसपणे अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणे अशा प्रकारे अवैध प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय चिंचवड ते दादर दरम्यान, तसेच शहरातील इतरही ठिकाणी राजरोसपणे सुरू आहे. हा प्रवास प्रवाशांच्याच जीवावर बेतत आहे. तीन दिवसांपूर्वीच लोणावळ्याजवळील बोरजजवळ अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीच्या अपघातात तीन जणांना जीव गमवावा लागला. राजरोसपणे अवैध वाहतूक सुरू असतानाही कारवाई होत नसल्याने या वाहतुकीला अभय कोणाचे असाच प्रश्न उपस्थित होतो.
मुंबई अथवा दादरला जायचे असल्यास रेल्वे आणि एसटी बससेवा उपलब्ध आहेत. रेल्वेची वेळ जुळत नसल्याने आणि झटपट प्रवास व्हावा यासाठी अनेकजण खासगी प्रवासी गाडीने प्रवास करतात. चिंचवड स्टेशन येथे खासगी वाहनाने प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. चिंचवड स्टेशन येथे दादरला जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. काही पावलांवरच एसटीचा अधिकृत थांबा आहे. मात्र, तेथील वाहनचालक प्रवाशांना थांब्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत.
पोलिसांच्या डोळ्यादेखत अवैध वाहतूक सुरू असते. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. प्रवासी वाहने उभ्या राहत असलेल्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावरच पोलीस ठाणे आहे. असे असतानाही अवैध प्रवासी वाहतुकीचा हा प्रकार पोलिसांच्या डोळ्यांना दिसत नाही, हे आश्चर्य आहे.