मनोस्वरूप विचारग्रंथाने माऊलींचा स्वसंवेद्य आत्मरूप विचार उलगडून पुढे नेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST2021-08-28T04:14:54+5:302021-08-28T04:14:54+5:30
आळंदी : ‘‘मन हे एकीकडे जड तत्त्व आहे. त्यामुळे ते प्रकृतीत मोडते. पण दुसरीकडे ते इतके सूक्ष्म व तरल ...

मनोस्वरूप विचारग्रंथाने माऊलींचा स्वसंवेद्य आत्मरूप विचार उलगडून पुढे नेला
आळंदी : ‘‘मन हे एकीकडे जड तत्त्व आहे. त्यामुळे ते प्रकृतीत मोडते. पण दुसरीकडे ते इतके सूक्ष्म व तरल आहे की त्याला एक मूलतत्त्वाचाच भाग मानण्याचा मोह व्हावा. मूलभूत चैतन्य तत्त्वाचे स्वरूप मनाच्या माध्यमातून समजून घ्यायला हवे. मनोस्वरूप विचारग्रंथात माऊलींचा स्वसंवेद्य आत्मरूप विचार उलगडून पुढे नेला,’’ असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ भाष्यकार, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
तीर्थक्षेत्र आळंदीत डॉ. अनिल सहस्रबुद्धे लिखित ‘मनोस्वरूप विचार’ आणि ‘संत प्रबोधित मनोस्वरूप विचार’ या ग्रंथाचे प्रकाशन सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, मनशक्तीचे प्रमुख विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, संशोधन विभागप्रमुख शास्त्रज्ञ गजानन केळकर, बाळासाहेब आरफळकर, दिलीप महाजन, राजेंद्र नवले, दिगंबर नरवडे, संदीप लोहर, अविनाश धनवे, किशोर धुमाळ, मंगेश कदम, अजित मालुंजकर, सुरेश कातोरे, अभिषेक हांडे, युवराज सुकळी, भीमसेन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख विश्वस्त अभय टिळक यांनी ग्रंथांतील सूत्रे उलगडून दाखवित ग्रंथाची उपयुक्तता विशद करत उपयुक्ततावाद अतिशय ताकदीने समजावून सांगितला. ‘मनशक्ती’ प्रयोग केंद्राचे प्रमुख विश्वस्त प्रमोदभाई शिंदे म्हणाले, आज जगभरातच जाणीवेबद्दल संशोधन चालू आहे. या संशोधनाची व्याप्ती आता फक्त तत्त्वज्ञान या विषयापुरती सीमित न राहता ती मेंदूशास्त्र, मानसशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, संगणकशास्त्र अशा अनेक शाखांशी जोडली गेली आहे. त्यामुळे मानवी मन म्हणजे काय हे समजून घेण्याची आवश्यकता संशोधकांना भासू लागली आहे.
कार्यक्रमात सुरेखा मोरे यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. उषा सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. उमेश बागडे यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. मच्छिंद्र मालुंजकर यांनी आभार मानले.
फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत ''मनोस्वरूप विचार'' आणि ''संत प्रबोधित मनोस्वरूप विचार'' या ग्रंथांचे प्रकाशन करताना मान्यवर.