जागतिक पर्यावरणात मानवजात भयभीत - डाॅ. श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:15 IST2021-08-24T04:15:46+5:302021-08-24T04:15:46+5:30
पुणेः- हुकूमशाहीचा वसा घेऊन वावरणारे राष्ट्राध्यक्ष हे संपूर्ण जगातील लोकांच्या जिवावर उठले आहेत. समाजात अधिकतर वाईट वृत्ती फोफावत ...

जागतिक पर्यावरणात मानवजात भयभीत - डाॅ. श्रीपाल सबनीस
पुणेः- हुकूमशाहीचा वसा घेऊन वावरणारे राष्ट्राध्यक्ष हे संपूर्ण जगातील लोकांच्या जिवावर उठले आहेत. समाजात अधिकतर वाईट वृत्ती फोफावत आहेत. भवताल प्रचंड अश्लील, असभ्य, क्रूर आणि हिंसक झालेला आहे. असे असले तरी आपणांस ह्यातूनच मार्ग काढत पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
संस्कृती प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि वि. दा. पिंगळे लिखित संस्काराच्या "पारंब्या" या पुस्तकाचे डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. ओंकार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या आयोजन करण्यात आले होते. या वेळी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, ओंकार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने, ग्रामीण कथाकार बबन पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, संत, विचारवंत यांची कास धरायची सोडून वैज्ञानिकांनी हिटलर प्रवृत्तीची तळी उचलण्याचे पाप केले आहे. संत आणि महापुरुषांचे मापदंड समाजासमोर ठेवणे आवश्यक आहे..
दिलीप बराटे म्हणाले, जाती-जातीच्या भिंती ढासळण्याऐवजी त्या अधिक उंच आणि मजबूत होत चालल्या आहेत. जातीजातींंमध्ये आरक्षणासारख्या मुद्यावरून संघर्ष पेटत आहे. खरे तर आर्थिक निकषांच्या आधारेच आगामी काळात आरक्षणाचे धोरण आखले पाहिजे.
लेखक वि. दा. पिंगळे यांनी लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. स्वप्निल दुधाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर देवेंद्र सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मी दुधाने यांनी आभार मानले.