जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबादेवाचा लग्नसोहळा दिवस असतो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मानाच्या शिखरकाठ्या मंदिराला टेकविण्याचा पारंपरिक मान आहे. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबामंदिरावर शुक्रवारी दुपारी सुपा येथील खैरे व शिरापूर(ता. दौंड) येथील होलम यांनी पारंपरिक रूढीनुसार मुख्य मंदिराला शिखरकाठी टेकून हा उत्सव साजरा केला. या वेळी सात ते आठ इतर गावांच्या प्रासादिक काठ्या सहभागी झाल्या होत्या. मंदिराभोवती शिखरकाठीची प्रदक्षिणा केली. या वेळी सहभागी भाविकांनी, तसेच अठरापगड जाती जमातीतील खंडोबाभक्तांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जल्लोष करीत भंडार खोबऱ्याची उधळण करून यात्रा पूर्ण केली. पौष पौर्णिमेनिमित्त सुप्याचे खैरे व दौंड तालुक्यातील शिरापूर येथील मानाची काठी परंपरेनुसार शिखराला टेकविण्यासाठी येते. शुक्रवारी सकाळी वाजतगाजत शिखरकाठी गडावर आणण्यात आली. काठीप्रमुख शहाजी खैरे व भाविक उपस्थित होते. दुपारी साडेबारा वाजता गडावर खैरे व होलम यांची काठी टेकविण्याचा मान पार पडला. तांबडे-पांढरे निशान हे या काठीची ओळख आहे. तांबडे-पांढरे वस्त्रांनी काठी सजविण्यात आली होती. गावातही अनेक ठिकाणी शिखरकाठ्यांच्या मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
जेजुरीवर मानाच्या शिखरकाठ्या
By admin | Updated: January 14, 2017 03:19 IST