मंगलदास बांदल यांचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:57+5:302021-09-02T04:23:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये जमीन विक्रीसाठी बनावट कर्जप्रकरण सादर करून फसवणूक केल्याप्रकरणात पुणे जिल्हा ...

Mangaldas Bandal's bail rejected | मंगलदास बांदल यांचा जामीन फेटाळला

मंगलदास बांदल यांचा जामीन फेटाळला

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये जमीन विक्रीसाठी बनावट कर्जप्रकरण सादर करून फसवणूक केल्याप्रकरणात पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांचा जामीन सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी फेटाळला.

जमीन विकत घेण्यासाठी २ कोटी १० लाख रुपयांचे वडगावशेरी येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून कर्ज घेतले. त्या बदल्यात जमीन गहाण ठेवली असतानाही तिची परस्परविक्री करण्यात आली. या प्रकरणात बांदलसह रुपेंदरकौर हरचरणपाल नंदा, हरचरणपाल मोहनसिंग नंदा (दोघेही, रा. कोंढवा), विजय दिनकर धुमाळ (पिंपळे धुमाळ, ता. शिरूर) आणि गोरख महादेव दोरगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. १९ जानेवारी २०१५ मध्ये घडलेल्या घटनेबाबत बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे.

बांदल यांनीच नाव येऊ नये, यासाठी दोघांना हाताशी धरून अधिकाऱ्यांच्या मदतीने कर्ज घेऊन पैसे स्वत:च्या फायद्याकरिता वापरले. हप्ते न भरता त्या जमिनीची विक्री केली आहे, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला. रुपेंदर कौर आणि हरचरण पाल या दोघांच्या नावावर हे कर्ज काढण्यात आले होते. ही जमीन विजय धुमाळ याला विकण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. त्या वेळी दोन्ही नंदा यांनी हा व्यवहार बांदल यांनी केला असल्याचे सांगितले आहे. ही जमीन बांदल याने धमकावून मालक सुरेश शिंदे यांना विकण्यास लावली. व्यवहार १ कोटी ४० लाख रुपयांचा ठरला असताना, त्यांना केवळ ७० लाख रुपये देण्यात आले आहेत. बांदल खुनशी प्रवृत्तीचा आहे. त्यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दाखल ४ गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. पूर्वी सात गुन्हे दाखल होते. त्याची शिक्रापूर परिसरात दहशत आहे. जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी अॅड. राजेश कावेडिया यांनी दिली. त्यानुसार न्यायालयाने बांदल यांचा जामीन फेटाळला.

--------------

Web Title: Mangaldas Bandal's bail rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.