मानापमान नाट्यावर पडदा?
By Admin | Updated: January 6, 2015 00:06 IST2015-01-06T00:06:55+5:302015-01-06T00:06:55+5:30
नियोजनात सहभागी न करून घेतल्याने नाराज झालेल्या महिला आणि बालकल्याण समिती सदस्यांची समजूत आता खासदार सुप्रिया सुळे काढणार आहेत.

मानापमान नाट्यावर पडदा?
पुणे : महापालिकेकडून नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या महिला महोत्सवाच्या नियोजनात सहभागी न करून घेतल्याने नाराज झालेल्या महिला आणि बालकल्याण समिती सदस्यांची समजूत आता खासदार सुप्रिया सुळे काढणार आहेत. या महोत्सवाच्या उद्घाटनावर समिती सदस्यांनी बहिष्कार घातल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राष्ट्रवादीच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सुळे यांच्यासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन समिती सदस्यांना सोमवारी दिले. त्यासाठी महापालिकेत खास बैठक बोलविण्यात आली होती.
पालिकेच्या सलग दोन महिला महोत्सवात मानापमान नाट्य घडल्यानंतर, या वर्षीच्या महिला महोत्सवातही मानापमान नाट्य रंगले. महापालिकेकडून शनिवारपासून सुरू करण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती, मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती, रमाबाई रानडे, वीरमाता राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने आयोजित महिला महोत्सवाच्या उद्घाटनास महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्यांनीच दांडी मारली. या महोत्सवाच्या आयोजन समितीत महिला आणि बालकल्याण समितीच्या एकाही सदस्यास न घेतल्याने तसेच महिलांसाठी असलेल्या या महोत्सवाच्या कार्यक्रमांचे नियोजन महिलांना न विचारताच पक्षनेत्यांनी केल्याने हा बहिष्कार टाकण्यात आला. त्यावर आपला पुढील निर्णय जाहीर करण्यासाठी समितीची आज खास बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत या महोत्सवाबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच महापौर दत्तात्रय धनकवडे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बैठक घेण्यात येणार असल्याचे सभागृह नेते सुभाष जगताप यांनी सांगितले. या वेळी या सदस्यांनी आपल्या सूचना द्याव्यात, असे सांगण्यात आले आहे.
तक्रार करणाऱ्या सदस्यास बोलू दिले नाही
सोमवारी झालेल्या खास बैठकीनंतर या महोत्सवाच्या नियोजनात आमची काहीही भूमिका राहणार नसली, तरी आमची नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक बोलावल्याचे काही सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तर या बैठकीत तक्रार करणाऱ्या काँग्रेस सदस्यास बोलू न दिल्याचेही सदस्यांनी सांगितले.
४या प्रकरणी सावध पवित्रा घेत या बैठकीनंतर सर्व सदस्यांची नाराजी दूर झाली असून, या पुढील कार्यक्रमांना सर्व समिती सदस्य उपस्थित राहणार असल्याचे समितीच्या अध्यक्षा सुनंदा देवकर यांनी सांगितले.