मलठण प्रकल्पातील जनावरांचे अखेर स्थलांतर
By Admin | Updated: June 24, 2016 02:01 IST2016-06-24T02:01:50+5:302016-06-24T02:01:50+5:30
चारा आणि पाण्याअभावी तडफडून मरत असल्याने न्यायालयाच्या ओशानुसार मलठण (ता. दौंड) येथील समृद्ध जीवन प्रकल्पातील जनावरे भोसरी येथील पूना पांजरपोळ ट्रस्टकडे स्थलांतरित करण्यात आली

मलठण प्रकल्पातील जनावरांचे अखेर स्थलांतर
राजेगाव : चारा आणि पाण्याअभावी तडफडून मरत असल्याने न्यायालयाच्या ओशानुसार मलठण (ता. दौंड) येथील समृद्ध जीवन प्रकल्पातील जनावरे भोसरी येथील पूना पांजरपोळ ट्रस्टकडे स्थलांतरित करण्यात आली. नऊ ट्रकमधून मोठ्या १०४ व लहान ३ गाई, अशा एकूण १०७ गार्इंचा समावेश आहे.
दरम्यान, प्रकल्पात आजअखेर १६७ म्हशी, २५ संकरित गाई आणि १३ गावरान गाई शिल्लक आहेत. ही जनावरेदेखील शुक्रवारी (दि. २४) स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती दौंडचे पशुधन विकास अधिकारी बाळासाहेब गायकवाड यांनी दिली.
येथील सर्व जनावरांचे संगोपन करण्याचा निर्णय भोसरी येथील पूना पांजरपोळ ट्रस्टने घेतला आहे, अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख ट्रस्टी पृथ्वीराज ऊर्फ बाबूशेठ बोथरा आणि मॅनेजिंग ट्रस्टी ओमप्रकाश राका यांनी दिली.
जनावरांची हेंडसाळ होत आहे, हे वेळीच आमच्या लक्षात आले असते, तर एकही जनावर दगावले नसते; परंतु सध्याची परिस्थिती पाहता मलठण (ता. दौंड) येथे जनावरांसाठी ३० हजारांचा चारा पाठविला असल्याचे पृथ्वीराज बोथरा यांनी स्पष्ट केले.
मलठण (ता. दौंड) येथील जनावरांची परिस्थिती पाहता लाडली गोशाळेचे आणि जगदंब ग्रुपचे प्रमुख निखिल स्वामी, अमित कदम, अमोल जगदाळे, रूपेश बंड, अविनाश जगदाळे, अक्षय अंकुश, अनिकेत बहिरमल, पांडुरंग मेरगळ परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. दरम्यान, जगदंब ग्रुपच्या वतीने ४ टन चारा देण्यात आला. तसेच, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष राजेंद्र खटी, सुरेंद्र बलदोटा, मोहन नारंग, अक्षय बुलाणी, सुनील व्हंकाडे यांनी ११ हजार ५०० रुपयांचा चारा दिला. तसेच, पुणे येथील उद्योगपती किशोर निम्हण यांनी २ टन चारा दिला. आज दौंडचे पशुधन विकास अधिकारी बाळासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली संपूर्ण दौंड तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागाने स्थलांतर कामात मोठी मेहनत घेतली. शिवाय, या विभागातील सर्व कमर्चारी व डॉक्टर यांनी वर्गणी गोळा करून चारावाहतुकीचा खर्च दिला, तर खानवटे येथून हनुमंत कन्हेरकर यांनी ५ गुंठे हिरवा चारा मोफत दिला.