माळशेज घाट बनला धोकादायक
By Admin | Updated: October 27, 2015 00:44 IST2015-10-27T00:44:32+5:302015-10-27T00:44:32+5:30
नगर ते कल्याण राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वरील नगर, ठाणे, पुणे या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला माळशेज घाट अत्यंत अवघड व धोकादायक झाला आहे

माळशेज घाट बनला धोकादायक
मढ : नगर ते कल्याण राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वरील नगर, ठाणे, पुणे या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला माळशेज घाट अत्यंत अवघड व धोकादायक झाला आहे. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी प्रवासी व वाहनचालकांनी केली आहे.
अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांबरोबरच विदर्भ व मराठवाड्यातून मुंबई, कल्याण, ठाणे, भिवंडी, वाशी, नवी मुंबई या भागात जाण्यासाठी हा मार्ग सर्वांत जवळचा व तुलनेने सुरक्षित आहे. वेळ, इंधन व पैसा वाचत असल्याने प्रवासी या मार्गावरून जातात.
उन्हाळ्यात डोंगरकडे मोठ्या प्रमाणावर तापतात व पावसाळ्यात या तापलेल्या कड्यांवर पाणी पडले असता ते तडकून मुख्य डोंगरापासून तुटून रस्त्यावर कोसळतात.
घाटातील बोगदा ते कल्याण बाजूकडील शेवटचे वळण या अंतरातील डोंगरकडे धोकादायक झाले आहे. त्यांची उंची ही मोठी आहे. ते केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याचे घाटातून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहनचालकांनी सांगितले. धोकादायक असणारे कडे ताबडतोब काढून टाकणे आवश्यक आहे. प्रसंगी काही कड्यांना पुणे-मुंबई मार्गावरील खंडाळा घाटातील कडे ज्याप्रमाणे तोडण्यात आले तसे पाहणी करून घाटातील धोकादायक डोंगरकडे तोडून घाट सुरक्षित करावा, तसेच आवश्यक तेथे लोखंडी जाळी बसवावी.
घाटात रस्ता अतिशय अरुंद व एकेरी मार्गाचा आहे. एका बाजूला उंचच उंच डोंगर व दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यास डोंगरकड्याला वाहन धडकून अथवा खोल दरीत कोसळून भीषण अपघात होण्याची भीती वाहनचालक व्यक्त करतात.
पावसाळ्यात दाट धुके व पावसामुळे माळशेज घाटात मोठ्या प्रमाणात अरुंद रस्ता व धोकादायक कड्याच्या दुरुस्तीचे काम करता येत नाही. परंतु, आता पाहणी करून माळशेज घाटात धोकादायक डोंगरकडे तोडून काढता येऊ शकतात व संभाव्य धोका टळू शकतो. तरी, माळशेज घाटातील धोकादायक ठिकाणाची, डोंगरकड्यांची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करावी व प्रवासी व वाहनचालकांना भयमुक्त प्रवास करण्यास मदत करावी.
(वार्ताहर)