माळेगाव सर्वाधिक दर परंपरा कायम ठेवणार

By Admin | Updated: November 17, 2016 02:43 IST2016-11-17T02:43:18+5:302016-11-17T02:43:18+5:30

ऊस टंचाईच्या हंगामातच येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ८ लाख ५० हजार मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Mallega will maintain the highest tariff tradition | माळेगाव सर्वाधिक दर परंपरा कायम ठेवणार

माळेगाव सर्वाधिक दर परंपरा कायम ठेवणार

बारामती : ऊस टंचाईच्या हंगामातच येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ८ लाख ५० हजार मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याचे सभासदांसह गेटकेन धारकांच्या उसावर १० लाख साखर पोती उत्पादन करण्याचा मानस आहे. या हंगामात ३० टक्के साखर निर्यातीसाठी उत्पादित होणार आहे. कारखान्याने ‘आॅनलाईन’ खरेदीचा प्रयोग केल्यामुळे आर्थिक बचत झाली आहे. त्यामुळे मागील वर्षी सर्वाधिक दर दिला. हीच परंपरा कायम ठेवणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, कार्यकारी संचालक विजय वाबळे यांनी दिली.
या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना यंदाच्या गळीत हंगामातील उसाच्या कमतरतेच्या अनुषंगाने माळेगाव कारखान्याने नियोजन केले आहे. सभासदांचा ऊस, तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील आणि कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेन धारकांचा ऊस आणणार आहे. गेटकेन धारकांना ५ वर्षांचा करार केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रतवारीनुसार साखर उत्पादित केली जाणार आहे. त्यामध्ये ३० टक्के साखर निर्यातक्षम असेल, असे यावेळी सांगण्यात आले.
माळेगाव कारखान्यावर नव्याने संचालक मंडळ आल्यावर उसाचे बिल, कर्ज हप्ते, कामगारांची देणी असे ८३ कोटी ७२ लाख रुपये आदा केले. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या अनुभवाच्या जोरावर देणी देत असताना जवळपास २० कोटी रुपयांचे नवे प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यामध्ये इथेनॉल, इव्हॉपरेशन, साखर गोडावून आणि शेततळे यांचा समावेश आहे.
कारखान्याचा तोटा भरून काढून सद्य:स्थितीला १५ लाखांचा नफा मिळविला, असे कार्यकारी संचालक वाबळे यांनी सांगितले.

कारखान्याचे आधुनिकीकरण होणार
४जवळपास ६० वर्ष या कारखान्याला झाले आहेत. आता कारखान्याचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये ‘ग्रॅव्हीटी प्लँट’ उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळा बरोबरच विजेची बचत, वाफ आदींची बचत होणार आहे. खासगी कारखान्यांशी सहकारी साखर कारखान्यांची स्पर्धा होत असताना माळेगाव कारखान्याने आधुनिकीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. माळेगावचे संकेतस्थळ (वेबसाईड) कारखान्याच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापकांनी केले. त्यामुळे आता देशभरातून साखर विक्रीसह अन्य कामांसाठी स्पर्धा होत आहे. तसेच, केलेल्या कामाचे बिल सादर केल्यानंतर ८ दिवसांत आॅनलाईन बिलाची पूर्तता केली जाते, असेही यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Mallega will maintain the highest tariff tradition