आमडेच्या जागेला माळीणकरांचा होकार
By Admin | Updated: February 2, 2015 00:27 IST2015-02-02T00:27:17+5:302015-02-02T00:27:17+5:30
पुनर्वसनासाठी माळीण ग्रामस्थांनी आमडे येथील जागा निश्चित केली आहे. कशाळवाडीत पुरेशी जागा मिळत नसल्याने प्रशासनाने

आमडेच्या जागेला माळीणकरांचा होकार
घोडेगाव : पुनर्वसनासाठी माळीण ग्रामस्थांनी आमडे येथील जागा निश्चित केली आहे. कशाळवाडीत पुरेशी जागा मिळत नसल्याने प्रशासनाने नव्याने आमडे व चिंचेचीवाडी येथील जागा पाहिली. ग्रामस्थांनी बैठक घेऊन व जागेची पाहणी करून आमडेची जागा निश्चित केली. त्यामुळे सहा महिन्यांपासून जागेअभावी रखडलेल्या पुनर्वसनाला आता गती मिळणार आहे.
नव्या वर्षात प्रशासनाने पुन्हा नव्याने जागा शोधण्याचे काम सुरू केले होते. प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे, तहसीलदार बी.जी. गोरे यांच्यासह नायब तहसीलदार विजय केंगले, धनंजय भांगरे, मंडल अधिकारी गणेश रोकडे, तलाठी एस.व्ही. पवार यांनी माळीण परिसरात फिरून जागा पाहणी केली. आमडे व चिंचेचीवाडी येथे दोन जागा पुनर्वसनासाठी योग्य असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे समजून घेतले. चिंचेचीवाडी जागेत माळीण ग्रामस्थांची भात खाचरे असल्यामुळे ही जागा देण्यास काहींनी नापसंती दर्शवली होती.
जागा निश्चित करण्यासाठी सर्व माळीण ग्रामस्थांनी आज (दि.१) बैठक घेतली. या वेळी नायब तहसीलदार विजय केंगले, धनंजय भांगरे, मंडलाधिकारी गणेश रोकडे, सरपंच दिगांबर भालचिम, सुहास झांजरे, सीताबाई विरनक, भामाबाई झांजरे, तान्हुबाई लेंभे, संजय झांजरे, शिवाजी लेंभे, मच्छिंद्र लेंभे, सचिन लेंभे, दिलीप लेंभे, गोविंद झांजरे, लक्ष्मीबाई झांजरे व मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ तसेच पुणे, मुंबई येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
या सर्वांनी मिळून आमडे येथील गट क्र. ४५ ची जागा पाहिली. या वेळी महसूल विभागाचे कर्मचारीदेखील हजर होते. जागा पाहिल्यानंतर माळीण ग्रामस्थांना ही जागा सोईची व योग्य वाटली. सर्वांनी मिळून या जागेला संमती दिली. (वार्ताहर)