माळीणकरांचा गुढीपाडवा यंदाही जुन्या घरातच?
By Admin | Updated: March 23, 2017 04:13 IST2017-03-23T04:13:34+5:302017-03-23T04:13:34+5:30
डोंगरचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत रक्ताच्या अनेक नात्यांना मुकलेल्या व तीन वर्षांपासून उन्हा-पावसात पत्र्याच्या घरांमध्ये

माळीणकरांचा गुढीपाडवा यंदाही जुन्या घरातच?
पुणे : डोंगरचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत रक्ताच्या अनेक नात्यांना मुकलेल्या व तीन वर्षांपासून उन्हा-पावसात पत्र्याच्या घरांमध्ये हालअपेष्टा सोसलेल्या माळीणकरांचा यंदाचा गुढीपाडवा आपल्या हक्कांच्या नवीन घरांमध्ये साजरा होणार अशी अपेक्षा होती. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या गावांचा लोकार्पण सोहळा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अथक परिश्रम घेऊन पुनवर्सित गावांची सर्व कामे पूर्ण करून सज्ज देखील केले. परंतु सध्या अधिवेशन सुरु असून मुख्यमंत्र्यासह अन्य सर्वंच मंत्र्यांच्या तारखा मिळत नसल्याने दुर्घटनाग्रस्त माळीणकरांना नवीन घरे तयार होऊन देखील पत्र्यांच्या घरातच गुढी पाडवा साजरा करावा लागणार आहे.
आंबेगाव तालुक्यात साह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माळीण गावावर तीन वर्षांपूर्वी ३० जुलै रोजी झालेल्या धुव्वाधार पावसामुळे डोंगराचा कडा कोसळून संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत शेकडो लोकांना आपले प्राण गमवले तर गावातील बहुतेक सर्व घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली केली. यामुळे संपूर्ण गावाचे अस्तित्वच नष्ट झाले. परंतु शासनानाच्या मदतीने जिल्हा प्रशासनाने प्रामुख्याने जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुढाकार घेऊन पुन्हा एकदा अत्यंत देखणे पुनवर्सित माळीण गाव उभे केले. जिल्हा प्रशासनने माळीण गावाच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी संपूर्ण गावांचा व पायभूत सुविधांचा आराखडा तयार करून आवश्यक असलेली जमिन खरेदी करण्यात आली. यामध्ये सुरुवातील निधी मिळण्यासाठी प्रशासनाला शासन दरबारी अनेक हेलपाटे मारावे लागले. त्यानंतर शासन, जिल्हा प्रशासन, विविध समाजिक संस्था व सर्वसामान्य नागरिक यांच्या मदतीने आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या ६७ घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. याशिवाय शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते, अंगणवाडी केंद्र, संरक्षण भिंत अशा सुमारे १८ पायभूत सुविधांनी सज्ज असे अत्यंत देखणे पुनर्वसित माळीण गाव उभे राहिले आहे.
नवीन वर्षांची सुरुवात गुढी पाडव्यानेचे होते, तसेच कोणत्याही चांगला गोष्टींचा शुभारंभ या दिवशी केली जाते. त्यामुळे माळीणकरांना त्यांची सर्व दुख: विसरून एका चांगल्या मुहूर्तावर नवीन घरांमध्ये प्रवेश करण्यासाठी ही चांगली संधी होती. परंतु माळीणच्या लोकार्पण सोहळा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २ एप्रिल ही तारीख दिल्याने गुढी पाडवा जुन्याच घरात होणार आहे.