पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात २० ते २२ एप्रिल दरम्यान चित्रपट रसिकांसाठी मल्याळम चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केरळ राज्य चलचित्र अकादमीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात अनेक नामांकित समांतर मल्याळम चित्रपट पहायला मिळणार असल्याने रसिकांना पर्वणी ठरणार आहे.मल्याळम चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन समारंभास अभिनेत्री आणि केरळ राज्य चलचित्र अकादमीच्या उपाध्यक्षा बीना पॉल उपस्थित राहणार आहेत. २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता उदघाटन होणार आहे. ‘अलोरुक्कम’ या चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महोत्सवात एकूण १२ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. त्यामध्ये ‘थोंडीमुथालम दृकशियम’, ‘अलोरुक्कम’, ‘ओट्टल’, ‘टेक आॅफ’ सारखे गाजलेले मल्याळम चित्रपट पाहण्याची संधी यावेळी मिळणार आहे. प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांची भारतीय चित्रपटसृष्टीत स्वत:चे अजोड स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये विशेषत: मल्याळम चित्रपटांनी आपल्या वास्तववादी आणि चिकित्सक दृष्टीकोनामुळे राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट रसिकांकडून खास पावती मिळवली आहे. राज्याराज्यातील सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्याद्वारे विद्यार्थी तसेच चित्रपट रसिकांना मल्याळी चित्रपटांच्या नवीन प्रवासाची ओळख होणार आहे. या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, जास्तीत जास्त रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात रसिकांना मल्याळम चित्रपटांची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 21:09 IST
मल्याळम चित्रपटांनी आपल्या वास्तववादी आणि चिकित्सक दृष्टीकोनामुळे राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट रसिकांकडून खास पावती मिळवली आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात रसिकांना मल्याळम चित्रपटांची मेजवानी
ठळक मुद्दे ‘अलोरुक्कम’, ‘ओट्टल’, ‘टेक आॅफ’ सारखे गाजलेले मल्याळम चित्रपट पाहण्याची संधी राज्या राज्यातील सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत या चित्रपट महोत्सवाचे आयोजन