देवाची गाणी तरी ‘ओरिजिनल’ करा
By Admin | Updated: January 24, 2017 02:34 IST2017-01-24T02:34:16+5:302017-01-24T02:34:16+5:30
‘झिंगाट’ गाण्याने अवघ्या जगाला वेड लावले. आज शौचालय अभियानातही ‘झिंगाट’च्या चालीवरील गाण्यामधून जनजागृती

देवाची गाणी तरी ‘ओरिजिनल’ करा
पुणे : ‘झिंगाट’ गाण्याने अवघ्या जगाला वेड लावले. आज शौचालय अभियानातही ‘झिंगाट’च्या चालीवरील गाण्यामधून जनजागृती केली जाते हे पाहून हसू येते. मात्र ही गोष्ट अभियानापर्यंत ठीक आहे. पण जेव्हा ‘झिंगाट’वर देवाची गाणी वाजविली जातात, तेव्हा खरंच वाईट वाटते. देवाची तरी ‘ओरिजिनल’ गाणी करा, असे खोड बोल प्रसिद्ध संगीतकार अजय गोगावले यांनी ‘कॉपीबहाद्दरांना’ सुनावले.
सिंबायोसिस संस्थेतर्फे आयोजित ‘सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सवा’चे उद्घाटन अजय-अतुल यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अभिनेते नीरज कबी यांना ‘सिंबायोसिस सांस्कृतिक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. २१ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार होते. प्रिन्सिपल डायरेक्टर विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते उपस्थित होते.
सिंबायोसिसमध्ये प्रवेश केल्यानंतर ‘झिंगाट’च्या गाण्याने त्यांचे स्वागत झाले, हे पाहून ते दोघेही जरा ओशाळले, या विद्येच्या माहेरघरात असे गाणे वाजले त्यापेक्षा ‘माऊली माऊली’ गाणे लागायला हवे होते, अशी मिश्किल टिप्पणी करीत अजय म्हणाले, ‘सैराट’च्या गाण्याने इतिहास रचला. संगीतकार अन्नु मलिक यांनी आम्हाला सांगितले, की तुमचे ‘झिंगाट’ हे गाणे नेदरलँड, फ्रान्स या ठिकाणी वाजविले जाते, इतका जागतिक स्तरावर या गाण्याने धिंगाणा घातला आहे. जगाच्या उत्कृष्ट १०० गीतांमध्ये या गाण्याचा समावेश झाला आहे, याचा नक्कीच आनंद होतो.’
‘सैराट’ने प्रसिद्धी दिली हे मान्य आहे, पण कुठे जायचे म्हणजे आज भीती वाटते, एकटे कुठेच जाऊ शकत नाही. आमचेही रसिकांवर प्रेम आहे, पण या गर्दीमुळे कार्यक्रमात काही अनुचित घडले तर अजय-अतुलच्या कार्यक्रमात गोंधळ झाला असे बोलायला तयार असतात, अशी खंत अजय यांनी व्यक्त केली.
(प्रतिनिधी)