पुण्यात पुन्हा येणार महिलाराज
By Admin | Updated: February 4, 2017 04:16 IST2017-02-04T04:16:06+5:302017-02-04T04:16:06+5:30
मुंबईमध्ये शुक्रवारी ११ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली, त्यामध्ये पुणे महापालिकाचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले आहे.

पुण्यात पुन्हा येणार महिलाराज
पुणे : मुंबईमध्ये शुक्रवारी ११ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली, त्यामध्ये पुणे महापालिकाचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे अडीच वर्षांनी पुन्हा महिलेच्या गळ्यात पुण्याच्या महापौर पदाची माळ पडणार असल्याचे निश्चित झाले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. महिलेसाठी महापौर पद आरक्षित झाल्याची बातमी कळताच महिला उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुंबईमध्ये मंत्रालयातील सभागृहात ११ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
प्रभागांची रचना जाहीर केल्याबरोबरच महापौर पदाची आरक्षणे जाहीर केली जातात. यंदा आॅक्टोबर २०१५ मध्ये प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली, मात्र महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली नव्हती. महापालिकेच्या आरक्षणाची सोडत कधी निघणार, याची इच्छुकांकडून सातत्याने निवडणूक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली जात होतीे. अखेर शुक्रवारी महापौर पद कुठल्या प्रवर्गासाठी राखीव असणार याचा सस्पेन्स संपला.
ज्या प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित होईल, त्या प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडे भावी महापौर म्हणून पाहिले जाते. त्यामुळे यापूर्वी महापौर पदाचे गाजर दाखवून अनेक पक्षांतरेही घडवून आणली जात होती. मात्र, यंदा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आरक्षण निश्चित होणार असल्यामुळे याचा वापर राजकीय पक्षांना करता आलेला नाही. (प्रतिनिधी)
पुणे महापालिकेचे महापौरपद २००७ मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होते. त्यावेळी राजलक्ष्मी भोसले या महापौर झाल्या होत्या. त्यानंतर सर्वसाधारणचे आरक्षण पडले होते. पुण्याचे महापौरपद आतापर्यंत अनुसूचित जमातीसाठी अद्यापी एकदाही राखीव राहिलेले नाही. त्यामुळे हे आरक्षण पडेल, असा अनेकांचा कयास होता. मात्र, यावेळेसही सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. दहा वर्षांनंतर पुन्हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे.