Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
By प्रशांत बिडवे | Updated: May 27, 2024 11:39 IST2024-05-27T11:31:13+5:302024-05-27T11:39:21+5:30
Maharashtra SSC 10th Result 2024 : यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च- २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी पेक्षा १.९८ टक्के निकाल जास्त लागला आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. यावेळी सचिव अनुराधा ओक उपस्थित होत्या.
दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९९.०१ टक्के लागला आहे. तुलनेने सर्वात कमी निकाल नागपूर मंडळाचा ९४.७३ टक्के एवढा लागला आहे. दुसरा क्रमांक कोल्हापूर ९७.४५, पुणे ९६.४४ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई- ९५.८३, अमरावती- ९५.५८, नाशिक ९५.२८, लातूर ९५.२७, छत्रपती संभाजीनगर ९५.१९ या मंडळाचा क्रमांक लागतो.
राज्यातील ९ हजार ३८२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. त्यापैकी लातूर मंडळातील १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के तर मुले ९४.५६ टक्के एवढे आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २.६५ टक्के जास्त आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दि.१ ते २६ मार्च या कालावधीत ५ हजार ८६ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले होते. राज्यातील २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यामध्ये ८ लाख ५९ हजार ४७८ विद्यार्थ्यांसह ७ लाख ४९ हजार ९११ विद्यार्थिनी आणि ५६ तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांचे अंतर्गत प्रात्यक्षिक आणि मूल्यमापनाचे गुण ओएमआर शीट ऐवजी ऑनालाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावर भरल्याने निकाल सुमारे एक ते दीड आठवडा अगोदर जाहीर करणे मंडळाला शक्य झाले आहे.
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल :
१. https://mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://sscresult.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
छायाप्रत, गुणपडताळणी साठी २८ मे पासून करा अर्ज गुणपडताळणी व छायाप्रतिसाठी दि. २८ मे ते ११ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. तसेच यंदा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ मध्ये श्रेणी/ गुण सुधार योजनेअंतर्गत परीक्षा देता येणार आहे.