कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:16 IST2021-09-05T04:16:22+5:302021-09-05T04:16:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेलपिंपळगाव : कर्नाटक राज्यात उच्च न्यायालयाने राज्यातील परंपरागत बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यास राज्य सरकारला संमती दिल्याने ...

कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवावी
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : कर्नाटक राज्यात उच्च न्यायालयाने राज्यातील परंपरागत बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यास राज्य सरकारला संमती दिल्याने कर्नाटकात बैलांच्या शर्यतींना हिरवा कंदील मिळणार आहे. वास्तविक हा निर्णय जरी राज्याबाहेरील असला तरीसुद्धा पुणे जिल्ह्यातील बैलगाडा संघटना, चालक - मालकांच्या अस्मितेचा आहे. परिणामी, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांकडून फटाके वाजवून स्वागत केले जात आहे. कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्याची मागणी स्थानिक बैलगाडा संघटना व मालकांकडून केली जात आहे.
जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरूर, मावळ, जुन्नर, हवेली, मुळशी, दौंड आदी तालुके बैलगाडा शर्यतींसाठी सुप्रसिद्ध आहेत. बैलगाडा शर्यतींवरील बंदी पूर्वी गावागावांतील यात्रा, जत्रा व उत्सवांमध्ये बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जात होत्या. विशेषतः स्पर्धेत पैशापेक्षा पारंपरिक खेळ जोपासण्यावर भर दिला गेला असला तरीसुद्धा विजेत्या स्पर्धकांना लाखों रुपयांची बक्षिसे व पारितोषिके देऊन चालना दिली जात होती. बैलगाडा शर्यतींमुळे गावच्या उत्सवांना वेगळीच आनंदाची झालर पांघरली होती. कालांतराने बैलांचा छळ होत असल्याच्या कारणावरून सन २००७ पासून शर्यतींच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली. तर २०१२ ला उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सुनावला. त्यामुळे सध्या यात्रा जत्रांचा उत्साह मावळला आहे.
दरम्यानच्या काळात अनेक संघटना, तसेच बैलगाडा चालक - मालक संघटना शर्यती सुरू करण्यासंदर्भात राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात बैलगाडा शर्यतींना सुधारित कायद्याच्या कलम २८ अ अंतर्गत राज्य सरकार बैलगाडा शर्यती आयोजित करण्यास परवानगी देऊ शकते असे निर्देश देण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारनेही बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलावी अशी मागणी बैलगाडा मालकांकडून केली जात आहे.
कोट
कर्नाटकात बैलगाडा शर्यती सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र राज्यातही कर्नाटकच्या धर्तीवर निर्णय घ्यावा. आमची अनेक वर्षांची प्रतीक्षा थांबवावी.
- संतोष गव्हाणे, बैलगाडा संघटना प्रतिनिधी.
कोट
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शर्यती बंद आहेत. वास्तविक आम्ही या निर्णयाचा आदर करतो. मात्र, आजही आमच्या अनेक बैलगाडा मालकांच्या दावणीला शर्यतींचे दहा ते बारा बैलांची जोपासना केली आहे. राज्यसरकारने कर्नाटकप्रमाणे आम्हालाही न्याय द्यावा. - पांडुरंग कुऱ्हाडे, बैलगाडा मालक आळंदी.
फोटो : बैलगाडा शर्यतींमधील क्षण.