भोर पंचायत समितीवर महिलाराज
By Admin | Updated: September 15, 2014 05:20 IST2014-09-15T05:20:59+5:302014-09-15T05:20:59+5:30
सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भोर पंचायत समितीत राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी

भोर पंचायत समितीवर महिलाराज
भोर : सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भोर पंचायत समितीत राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी आताही कायम ठेवत सभापतिपदी राष्ट्रवादीच्या नंदा शेडगे यांनी काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांचा पराभव करत विराजमान झाल्या, तर उपसभापतिपदी शिवसेनेच्या रोहिणी बागल यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे पंचायत समितीत महिलाराज आले आहे.
नंदा शेडगे यांनी काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांचा ६ विरुद्ध ० मतांनी पराभव केला.
भोर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी संजय आसवले यांनी काम पहिले. या वेळी तहसीलदार राम चोबे, गटविकास अधिकारी संजय गायकवाड, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, पक्षनिरीक्षक शांताराम इंगवले, मानसिंग धुमाळ, कुलदीप कोंडे, रमेश कोंडे, शरद ढमाले, भालचंद्र जगताप, संतोष घोरपडे, अमोल पांगारे, अनिल पवार, रणजित शिवतरे, आबा शेडगे, तृप्ती खुटवड, वंदना धुमाळ, स्वाती कुंभार, हसिना शेख, विठ्ठल श्ािंदे, प्रकाश तनपुरे, यशवंत डाळ, सुनील धुमाळ उपस्थित होते.
सभापतिपद इतरमागास प्रवर्गासाठी राखीव होते. या पदासाठी राष्ट्रवादीकडून नंदा शेडगे, तर काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांनी उमेदवारीअर्ज दाखल केले होते; तर उपसभापतिपदासाठी शिवसेनेच्या रोहिणी बागल यांचा एकमेव अर्ज होता. सकाळी १० वा. अर्ज भरल्यावर दुपारी २ वा निवडणूकप्रक्रियेला सुरुवात झाली. काँग्रेसकडून सभापतिपदासाठी अर्ज दाखल करून मतदानात भाग घेण्याअगोदरच सतीश चव्हाण व सुवर्णा मळेकर सभागृहाबाहेर गेले. त्यानंतर हातवर करून झालेल्या मतदानात नंदा शेडगे यांना ६, तर चहाण यांना ० मते मिळाली. उपसभापतिपदी रोहिणी बागल बिनविरोध निवडून आल्या. मतदानप्रक्रियेत माजी सभापती सुनीता बाठे, रणजित शिवतरे, संतोष घोरपडे, अमोल पांगारे यांनी भाग घेतला २०१२ रोजी झालेल्या पं. स निवडणुकीत ८ पैकी राष्ट्रवादीला ४, तर शिवसेनेला व कॉँग्रेसला प्रत्येकी २ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी झाली व राष्ट्रवादीचा सभापती, तर शिवसेनेचा उपसभापती झाले. (वार्ताहर)