मोबाईलच्या शोधापेक्षा क्रमांकावर प्रेम अधिक
By Admin | Updated: February 25, 2015 00:42 IST2015-02-25T00:42:03+5:302015-02-25T00:42:03+5:30
दर दिवशी मोबाईल हरविल्या बाबतच्या किमान दोन तक्रारींची नोंद प्रत्येक पोलीस ठाण्यात होत आहे. तक्रारीनंतर मोबाईलऐवजी त्यातील त्याच

मोबाईलच्या शोधापेक्षा क्रमांकावर प्रेम अधिक
मंगेश पांडे, पिंपरी
दर दिवशी मोबाईल हरविल्या बाबतच्या किमान दोन तक्रारींची नोंद प्रत्येक पोलीस ठाण्यात होत आहे. तक्रारीनंतर मोबाईलऐवजी त्यातील त्याच क्रमांकाचे दुसरे सिम कार्ड घेता यावे यासाठीच पोलिसांकडील तक्रारीची प्रत मिळविणाऱ्यांचे
प्रमाण अधिक आहे. तक्रार करूनही हरविलेले मोबाईल सापडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
सध्या मोबाईल फोनचा वापर वाढला आहे. मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये तरुण-तरुणींची संख्या अधिक आहे. मात्र, मोबाईल हाताळताना आवश्यक ती दक्षता घेतली जात नाही. त्यामुळेच अनेकांचे मोबाईल चोरीला जातात, काहींंचे हरवितात.
मोबाईल चोरीला गेला अथवा खरोखरच हरविला, तरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर त्याबाबत ‘प्रॉपर्टी मिसिंग’ अशी नोंद केली जाते. मोबाईल कंपनीचे नाव, मोबाईलचा आयएमईआय क्रमांक, त्यातील सिमकार्डचा क्रमांक याची नोंद केली जाते. त्यानंतर ठाण्यातील तपास अधिकारी याबाबतचा अहवाल परिमंडळ तीनच्या कार्यालयात पाठवितात. येथून हरविलेल्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक संबंधित मोबाईल कंपनीला कळविला जातो. त्यानंतर अन्य व्यक्तीने मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकल्यास ताबडतोब मोबाईल ज्या क्षेत्रात आहे, त्या स्थळाची (लोकेशन) कंपनीला माहिती मिळते. यासह त्यामध्ये कोणत्या क्रमांकाचे सिमकार्ड आहे याचीही माहिती उपलब्ध होते. यावरून मोबाईला शोध घेणे शक्य होते.
मोबाईल बंद असल्यास अडचण निर्माण होते. तसेच त्याचा शोध घेणे कठीण होते. अनेकदा चोरलेल्या मोबाईलधील सिमकार्ड चोरटा काढून टाकतो. त्यामुळे ‘आयएमईआय’ क्रमांकाच्या आधारावरही शोध घेणे शक्य होत नाही. अनेकांना मोबाईलपेक्षाही त्यातील सिमकार्ड महत्त्वाचे असते. त्यामुळे मोबाईल हरविल्याबाबत ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याचा शोध लागला का, याबाबतची विचारणा करण्यासाठी संबंधित व्यक्ती ठाण्यात फेऱ्या मारत असते. मात्र, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे तक्रारदाराच्या पदरी निराशाच पडते. यामुळे अनेक तक्रारदार मोबाईल पुन्हा मिळण्याची आशाच सोडून देतात. परंतु नातेवाईक, व्यावसायिक यांच्यामध्ये प्रचलित असलेला मोबाईल क्रमांक मिळविण्याचा आग्रह असतो. पुन्हा त्याच क्रमांकाचे सिमकार्ड मिळवायचे असल्यास सिमकार्ड कंपनीला तक्रारीची प्रत देणे बंधनकारक असते.