स्मार्ट सिटीच्या मॉडेल एरियात समस्याच भरपूर
By Admin | Updated: January 23, 2017 03:24 IST2017-01-23T03:24:15+5:302017-01-23T03:24:15+5:30
सध्याचा वॉर्ड क्रमांक ८,९ व १० मधील भाग एकत्र करून नव्या प्रभाग रचनेत बाणेर-बालेवाडी-पाषाण हा प्रभाग क्रमांक ९ तयार झाला

स्मार्ट सिटीच्या मॉडेल एरियात समस्याच भरपूर
बाणेर : सध्याचा वॉर्ड क्रमांक ८,९ व १० मधील भाग एकत्र करून नव्या प्रभाग रचनेत बाणेर-बालेवाडी-पाषाण हा प्रभाग क्रमांक ९ तयार झाला आहे. प्रभागाच्या नव्या फेररचनेमुळे व आरक्षणाच्या बदलामुळे हा प्रभाग चांगलाच चर्चेत आला आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्त्वाकांक्षी योजनेतील पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येणारा भाग म्हणून व पुणे शहरात सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेला भाग अशी बाणेर-बालेवाडी-पाषाण या प्रभागाची ओळख आहे. १२ वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर बाणेर-बालेवाडीचा झालेला विकास निश्चित डोळ्यांचे पारणे फिटविणारा असला, तरी अजूनही काही समस्या या भागात कायम आहेत, हे लक्षात घ्यावे लागणार आहे. एकीकडे ८ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेली ५० लाख लिटरची पाण्याची टाकी व त्यामुळे निर्माण झालेला बाणेर-बालेवाडीचा पाणी प्रश्न, पाषाण-सूस खिंडीत महामार्गावरील अरुंद पुलामुळे होत असलेल्या वाहतूककोंडीचा प्रश्न, पाषाण तलावातील जलपर्णीचा प्रश्न, अनेक ठिकाणी बंद अवस्थेतील सिग्नल यंत्रणा, बांधून तयार असलेली मात्र अद्याप सुरू न झालेली बालेवाडी येथील अंकित पोलीस चौकी, अर्धवट अवस्थेतील बालेवाडी-वाकड पूल, पाषाण व बालेवाडीमध्ये प्रशस्त उद्यानाची कमतरता, बाणेर येथील बंद अवस्थेतील भाजी मंडई, शौचालये व महिलांसाठी प्रसाधनगृहांचा अभाव हे प्रश्न आजही कायम असताना दुसरीकडे पाषाण सूस रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरण, पाषाण व पंचवटी येथे सुमारे ३५ लाख लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे हाय कंट्रोल लाईन टाकून सुरू असलेले काम, ओपन अॅमेनिटी स्पेसचे लोकहितासाठी सुयोग्य पद्धतीने केलेले नियोजन, उत्तम दर्जाचे मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते व यामुळे परिसरातील विविध भागांशी असलेली सहजसुलभ कनेक्टिव्हिटी यामुळे या परिसरात पुणे शहरातून अनेक कुटुंबे वास्तव्यास येत आहेत, ही जमेची बाजू आहे.