ग्रंथालयाच्या डिजिटायझेशनला खो
By Admin | Updated: October 29, 2015 00:08 IST2015-10-29T00:08:11+5:302015-10-29T00:08:11+5:30
‘डिजिटल इंडिया’च्या संकल्पनेचा उदो उदो होत असताना प्राचीन पुस्तकांच्या डिजिटायझेशनची संकल्पना अद्याप कागदावरच आहे. पुणे मराठी ग्रंथालयाचे डिजिटायझेशन केवळ निधीअभावी रखडले आहे.

ग्रंथालयाच्या डिजिटायझेशनला खो
पुणे : ‘डिजिटल इंडिया’च्या संकल्पनेचा उदो उदो होत असताना प्राचीन पुस्तकांच्या डिजिटायझेशनची संकल्पना अद्याप कागदावरच आहे. पुणे मराठी ग्रंथालयाचे डिजिटायझेशन केवळ निधीअभावी रखडले आहे.
पुणे मराठी ग्रंथालयाची व्याप्ती मोठी आहे. ग्रंथालयात सुमारे १,५०,००० पुस्तके असून ५०,००० च्या आसपास प्राचीन नियतकालिके आहेत. ५०,००० संदर्भग्रंथ हा ग्रंथालयाचा आणि ग्रंथचळवळीचा मोठा वारसाच म्हणावा लागेल. अनेक वर्षांपासून जतन केलेल्या या ग्रंथसंपदेचे डिजिटायझेशन होण्याची प्रकर्षाने गरज आहे. भावी काळात वाचनसंस्कृती टिकवून ठेवायची असेल तर डिजिटल पुस्तकांचा वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचायला हवा. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू असूनही अद्याप यश मिळाले नसल्याचे पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यवाह बाळासाहेब कुलकर्णी यांनी सांगितले.
स्वातंत्र्यपूर्व काळात सर्व चळवळींमध्ये ग्रंथांनी उल्लेखनीय योगदान दिले. काळाच्या ओघात विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा झाली, मात्र, ग्रंथालयांची स्थिती ‘जैसे थे’ राहिली. गेल्या ७० वर्षांमध्ये जो विकास झाला नाही, तो आता करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट आहे. मात्र, मोहनराय फाउंडेशनने डिजिटायझेशनसाठी अर्ज मागवला असल्याने आशेचा किरण दिसू लागला आहे.
स्मार्ट सिटीबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहे. मात्र, त्यामध्ये ग्रंथालये ‘स्मार्ट’ होण्याच्या दृष्टीने कोणतीही तरतूद नसल्याने संवेदनशीलता हरवत चालली आहे की काय, असा प्रश्न साहित्यिकांनी उपस्थित केला. तरुण पिढीतील वाचनाची गोडी टिकवून ठेवायची असेल तर प्रशासनाने उदासीनता झटकून ‘डिजिटल लायब्ररी’ची संकल्पना हाती घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)