शिक्षण मंडळाच्या प्रयत्नाला खो
By Admin | Updated: May 18, 2015 23:08 IST2015-05-18T23:08:12+5:302015-05-18T23:08:12+5:30
बारामती नगरपालिका शिक्षण मंडळाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव नगरपालिकेला दिला होता.

शिक्षण मंडळाच्या प्रयत्नाला खो
बारामती : बारामती नगरपालिका शिक्षण मंडळाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव नगरपालिकेला दिला होता. परंतु, नगरपालिकेच्या सन २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात शिक्षकांच्या पगाराच्या संभाव्य खर्चाची तरतूद नसल्याने यंदा नगरपालिकेच्या शाळेत इंग्रजी शिक्षण मिळण्याची शक्यताच संपुष्टात आली आहे.
नगरपालिका शिक्षण मंडळाच्या आजच्या सभेत नर्सरी ते एचकेजी आणि ८वी ते १०वी चे माध्यमिक विद्यालय सुरू करण्याचा विषय घेण्यात आला होता. नगरपालिकेला शिक्षण मंडळाने यापूर्वीच या संदर्भात प्रस्ताव दिला होता. परंतु, २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात इंग्रजी माध्यमाच्या शाळा, माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या वेतनाच्या बाबत संभाव्य खर्चाची तरतूद करण्यात आलेली नाही. सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात तशी तरतूद करण्यात येईल. मात्र, ८वी ते १० वीचे वर्ग सुरू करण्यासाठी सध्या शिक्षण मंडळाकडे उपलब्ध असलेल्या शिक्षकांमधूनच कार्यवाही करावी, असा ठराव करण्यात आल्याचे पत्र मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी शिक्षण मंडळाला दिले आहे. शिक्षण मंडळ पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी २०१४ पासून इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करणे, ८वी ते १०वी माध्यमिक शाळांचे वर्ग सुरू करण्यासाठी नगरपालिकेला प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार आर्थिक तरतूद करावी, असे कळविले होते. आज झालेल्या बैठकीत नगरपालिकेने दिलेल्या पत्राची माहिती देण्यात आली. अर्थसंकल्पात तरतूद नसल्यामुळे यंदा तरी इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करणे शक्य होणार नाही. या संदर्भात शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आमदार अजित पवार यांना भेटणार आहेत. हे वर्ग सुरू करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, याची मागणी ते करणार आहेत.
अंदाजपत्रकात तरतूद करणे आवश्यक : झिंजाड
४या संदर्भात मुख्याधिकारी दीपक झिंजाड म्हणाले, इंग्रजी माध्यमांच्या शाळेसाठी येणाऱ्या खर्चाला आर्थिक तरतूद अंदाजपत्रकात करणे आवश्यक आहे. मात्र, ८वी ते १०वी च्या माध्यमिक शाळांचे वर्ग उपलब्ध शिक्षकांच्या माध्यमातून करणे शक्य आहे. तिन्ही वर्ग एकदाच सुरू होणार नाहीत. ८वीचा वर्ग यंदा सुरू होईल. नैसर्गिक वाढीनंतर ९वी, १०वीचे वर्ग सुरू होतील. त्यानुसार अंदाजपत्रकात २०१६-१७ ला तरतूद करणे शक्य होईल.
४नगरपालिकेच्या शाळांमध्ये साधारणत: गरीब वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेतात. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील शैक्षणिक शुल्क परवडणारे नाही. त्यामुळे गरीब विद्यार्थी इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहतो. या कारणास्तव शिक्षण मंडळाचे सभापती माधव जोशी, उपसभापती पराग साळवी व सदस्यांनी पाठपुरावा केला आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पातच तरतूद न केल्यामुळे यंदा इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.