चाकू हल्ला करत स्टेशन मास्तरला लुटले
By Admin | Updated: June 7, 2014 00:28 IST2014-06-06T23:29:03+5:302014-06-07T00:28:08+5:30
लोणावळा रेल्वे स्थानकाहून सुटणार्या लोकलमध्ये रेल्वे स्टेशन मास्तर नारायण जी़ शेळके यांच्यावर चार अज्ञात युवकांनी चाकू हल्ला केला.

चाकू हल्ला करत स्टेशन मास्तरला लुटले
लोणावळा : रात्री १०़०५ मिनिटांनी लोणावळा रेल्वे स्थानकाहून सुटणार्या लोकलमध्ये रेल्वे स्टेशन मास्तर नारायण जी़ शेळके यांच्यावर चार अज्ञात युवकांनी चाकू हल्ला केला. त्यांच्याकडील रोकड व एक मोबाईल फ ोन घेऊन मळवली रेल्वे स्थानकावर पोबारा केला़
या घटनेमध्ये शेळके यांच्या गळ्याला मार लागला असून, लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ चोरट्यांनी त्यांचा गळा चिरण्याचा प्रयत्न केल्याने मोठी जखम झाली असून १४ टाके घालण्यात आले आहेत. दरम्यान, शेळके यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले़ मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेसने आलेले स्टेशन मास्तर शेळके गुरुवारी रात्री लोणावळ्यात उतरले व पुण्याला जाणार्या १०़०५ च्या लोकलमध्ये फ र्स्ट क्लास डब्ब्यात बसले होते़ गाडी स्टेशनवरून सुटल्याने मागून पळत येऊन चार तरुणांनी गाडीत प्रवेश केला. गाडी थोडी पुढे गेल्यानंतर या चोरट्यांनी शेळके यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील सर्व रोकड काढून घेतली; तसेच त्यांचा मोबाईल हिसकावून घेत फे कून दिला़ प्रतिकार करायला गेलेल्या शेळके यांच्या गळ्यावर त्यांनी चाकूचा हल्ला करत गळा चिरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मळवली स्थानक आल्याने ते चौघेही उतरुन पसार झाले़ ते २० ते २२ वयोगटांतील आहेत़
हल्ल्याचा उद्देश काय?
लोणावळा रेल्वे स्थानकावरील गर्दुले व पाकिटमार यांचा सुळसुळाट मागील काही काळापासून सुरू आहे़ यापूर्वी स्थानकावर वाढलेला बकालपणा, गर्दुल्यांचा वाढता वावर आदींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेळके यांनी रेल्वे पोलिसांना सूचना देऊन त्यांच्यावर कारवाई करा, असे बजावले होते़
हल्ला हा त्यांना लुटण्यासाठी होता की जाणीवपूर्वक पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला केला गेला, याबाबत रेल्वे पोलीस तपास करत आहेत़ दरम्यान, ही घटना घडल्यानंतर स्थानक व परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने काय उपाययोजना करता येतील, याकरिता रेल्वेच्या जीआरपीएफ पोलिसांची आज सकाळी तातडीची बैठक झाली़