वाहनचालकांच्याही पीएफची लूट
By Admin | Updated: October 7, 2016 03:34 IST2016-10-07T03:34:06+5:302016-10-07T03:34:06+5:30
महापालिकेतील कंत्राटी वाहनचालकांच्या भविष्यनिर्वाह निधीची लूट होत आहे. सुमारे ४५० चालकांना पालिकेत अनेक वर्षे काम करीत असून ठेकेदारी पद्धतीमुळे भविष्यनिर्वाह निधी

वाहनचालकांच्याही पीएफची लूट
पुणे : महापालिकेतील कंत्राटी वाहनचालकांच्या भविष्यनिर्वाह निधीची लूट होत आहे. सुमारे ४५० चालकांना पालिकेत अनेक वर्षे काम करीत असून ठेकेदारी पद्धतीमुळे भविष्यनिर्वाह निधी, राज्य कामगार विमा योजना, कामगार कल्याण निधी रजा वेतन आदी फायदे मिळायला तयार नाहीत. गेल्या काही वर्षांत किमान २ कोटी रुपयांचा या पद्धतीने अपहार झाला असल्याचे माहितीचा अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीतून उघड होत आहे.
विशिष्ट ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याने कारवाई केली जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. पालिकेच्या वाहनांसाठी गेली अनेक वर्षे कायमस्वरूपी चालक न घेता, कंत्राटी पद्धतीने घेतले जातात. सुमारे ४५० चालक सध्या पालिकेत या पद्धतीने कार्यरत आहेत. कायद्याप्रमाणे भविष्यनिर्वाह निधी, विमा योजना, कामगारकल्याण निधी असे सर्व नियम कंत्राटी कामगारांनाही लागू आहेत. ठेकेदाराने त्यांचे पालन करणे अपेक्षित आहे. प्रामुख्याने त्याने त्याच्याकडील प्रत्येक कामगाराचा भविष्यनिर्वाह निधीतील त्याचा हिस्सा संबंधित कामगारांच्या खात्यात नियमित जमा करणे बंंधनकारक आहे. प्रत्यक्षात त्याचा हिस्सा व कामगारांचाही हिस्सा खिशात घालून नंतर जुजबी वेतन देऊन कामगारांचे तोंड बंद केले जात आहे. याची माहिती असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे मनसेचे म्हणणे आहे.
माहितीच्या अधिकार कायद्यान्वये त्यांनी पालिकेतून यासंबंधीची सर्व माहिती मागविली होती. त्यातूनच यातील गैरप्रकार उघड झाला असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. ठेकेदाराने त्याच्या कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी जमा केल्याचे चलने दाखल केल्यानंतरच त्याला त्याचे बिल दिले जावे, असा नियम आहे. प्रत्यक्षात मात्र तशी चलने दाखल केली नाहीत, तरीही त्यांना दरमहा लाखो रुपयांची बिले अदा केली जातात. वाहन विभागाने दिलेल्या कागदपत्रांतूनच हे उघड होत आहे. याविरोधात कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शहरप्रमुख अजय शिंदे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)