लोणी स्टेशन पालखीस्थळ बनला जुगारींचा तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:10+5:302021-02-23T04:16:10+5:30
कदमवाकवस्ती : लोणी स्टेशन (ता. हवेली) येथील संत तुकाराम महाराज पालखीच्या वारकऱ्यांच्या निवासासाठी असलेल्या पालखीस्थळावर सध्या जुगारी व तळीरामांनी ...

लोणी स्टेशन पालखीस्थळ बनला जुगारींचा तळ
कदमवाकवस्ती : लोणी स्टेशन (ता. हवेली) येथील संत तुकाराम महाराज पालखीच्या वारकऱ्यांच्या निवासासाठी असलेल्या पालखीस्थळावर सध्या जुगारी व तळीरामांनी तळ ठोकला आहे. येथील झाडाखाली काहीजण दिवसाढवळ्या पत्त्यांचा डाव रंगवत आहेत. तर पालखीस्थळावरील सभागृहात तळीराम पार्ट्या करत आहेत. या तळीरामांवर कारवाई करण्याची मागणी नागिरकांनी केली आहे.
पूर्व हवेलीतील लोणी स्टेशन परिसरातील तरुणाई व्यसनाधिनतेकडे वळली असल्याचे चित्र आहे. सार्वजनिक जागेत व्यसने तसेच जुगारांचा डाव खेळला जात आहे. लोणी स्टेशन येथे असणाऱ्या पालखीतळालाही या मद्यपींनी सोडले नाही. भर दिवसा येथील झाडांखाली जुगारी पत्ते खेळत असतात. तर पालखी तळाच्या सभागृहात मद्यपी दारू पित बसले असतात. पालखीस्थळाशेजारून लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन गावांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या मद्यपींच्या त्रासाला सामोरे जावे लागले. लोणी काळभोरमध्ये बाजार व इतर कामासाठी जाणाऱ्या महिलांनाही या तळीरामांचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कुठलीच कारवाई केली जात नाही. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने विचार करून कठोर कारवाई केली तर या जुगारी व मद्यप्रेमींना चाप बसेल.
कोट
पालखीस्थळावर बसणाऱ्या जुगारी आणि मद्यपींमुळे तेथून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना व महिला वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई झालेली नाही. पोलिसांनी कारवाई केल्यास येथील अवैध धंदे बंद होतील व स्थानिकांना होणारा त्रास कमी होईल.
- प्रियंका भिसे-
पोलीस पाटील, कदमवाकवस्ती